भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची इभ्रत लुटण्यात आली, ते दुसरे कॅप्टन अशोक खरात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यानंतर आमदार गायकवाडांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे विजयराज शिंदे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले. या दाव्यावर आमदार गायकवाड यांनी तत्काळ प्रत्त्युतर देत शंभर काय, हजार कोटींचा दावा केला तरी मागे हटणार नाही, मी खोटे बोलत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत, असा दावा गायकवाड यांनी केला.
आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीमधील मैत्रीचे संबंध आता कटुतेकडे जाण्याची चर्चा बुलढाण्यासह जिल्हाभरात वाढली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांसोबतच अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्रास होत असून पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत आहेत, असे आमदार गायकवाड म्हणाले होते. चिखली येथे दोन वेळा झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. पक्ष प्रवेशानंतर भाजपच्या आमदार श्वेता महाले व आमदार संजय गायकवाड यांच्यात शाब्दीक युद्ध भडकले. त्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. भाजपला 'टार्गेट' केले जातेय म्हणून जिल्हाध्यक्ष या नात्याने विजयराज शिंदे यांनी आमदार गायकवाडांना ‘लक्ष्य’ केले. पत्रकार परिषदा घेऊन दोघांकडून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी, तेथील महिला कर्मचारी आणि आपल्याबद्दल खालच्या पातळीवर गलिच्छ आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केल्याचे सांगत विजयराज शिंदे म्हणाले, आश्रमशाळेत तीनशे आदिवासी विद्यार्थिनी आहेत. ३० ते ३५ महिला कर्मचारी आहेत. त्यांच्याविषयी आमदारांनी केलेले वक्तव्य बेताल आणि मानहानीकारक आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक आणि शहर पोलिसांत तक्रार केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. या प्रकरणात शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गायकवाड हे आपल्या दाव्यावर ठाम राहिले. आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा दावा गायकवाड यांनी केला. आपल्यावर होणाऱ्या आरोपांपासून वाचण्यासाठी शिंदे यांनी महिला कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचे गायकवाड म्हणाले. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली. एका प्रकरणात चौकशी समितीने केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आले, त्या अहवालातील काही पाने गायब करण्यात आल्याचा खळबळजनक दावा गायकवाड यांनी केला. त्या अहवालात संस्थेविषयी उल्लेख होता, असेही गायकवाड म्हणाले.



