हरियाणामध्येशेतकऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हरियाणात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. केरळमध्ये एका तरुणीच्या लग्नाचा वाद राजकीय हेतूने चर्चेत आला. बहराइचमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला व मुलगा जखमी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ड्रग तस्करांवर कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य ड्रग तस्कर टोळीचा पर्दाफाश केला. छत्तीसगडमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली.

हरियाणामध्येशेतकऱ्यांचे आंदोलन

अंबाला : भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी हरियाणाच्या विविध भागांत गहू खरेदीतील अडचणी आणि ऑनलाइन पोर्टल प्रणालीतील समस्यांच्या निषेधार्थ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक बिघाड आणि बँक खात्यांशी संबंधित समस्यांमुळे शेतमालाची विक्री व बिले मिळण्यास विलंब होत असून, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

राजकीय हेतूने वाद

तिरुअनंतपुरम : प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान चर्चेत आलेल्या आणि नंतर केरळमधील एका मंदिरात आपल्या मुस्लिम मित्राशी विवाह केलेल्या तरुणीच्या लग्नासंदर्भातील वादामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप ‘सीपीआय’चे राज्य सचिव बिनॉय विश्वम यांनी शनिवारी केला. लग्नाच्या वेळी ती केवळ १६ वर्षांची असल्याचा दावा समोर आल्यानंतर मध्य प्रदेशात या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बिबट्याचे हल्ले

बहराइच : येथील कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक महिला आणि एक मुलगा जखमी झाले. गेल्या आठवडाभरात अभयारण्य परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या पाच घटनांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाने जखमींना तातडीची आर्थिक मदत दिली असून, जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

ड्रग तस्करांवर कारवाई

जम्मू : ‘सीमापार अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कायद्याचा पूर्ण वापर केला जाईल,’ असे जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी सांगितले. अटक केलेल्या आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यासह ‘आधार’ सारखी कागदपत्रे रद्द करणे आणि दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीर अमली पदार्थमुक्त करण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात म्हणून येथे आयोजित पदयात्रेत ते बोलत होते.

टोळीचा पर्दाफाश

नवी दिल्ली : बिहार आणि दिल्ली दरम्यान सक्रिय असलेल्या आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बिहारच्या मधेपुरा येथून मुख्य पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. हौज काजी पोलिस ठाण्यात २४ मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. सोनू असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मुलीवर अत्याचार

दुर्ग : छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले असून, नराधमाने मुलीला एका पोत्यात भरून विहिरीजवळ फेकून दिले होते. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी आरोपी धनेश्वर साहूला अटक केली आहे.