रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून तरुणीसह दोघांची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रदीप व्यंकटराव चौधरी, करुणा प्रदीप चौधरी (दोन्ही रा. द्वारकापुरी, पार्वतीनगर), अजय कवडूजी भोयर (रा. वंजारीनगर), राहुल शेंडे व मधुकर उके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनुपम राजगुप्ता मेश्राम वय (वय ४२, रा. हरिदासनगर, लष्करीबाग) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अनुपम व प्रदीप एकाच कंपनीत काम करीत असल्याने दोघे एकमेकांना ओळखायचे. ‘रेल्वेत बडे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, ते कोणालाही रेल्वेत नोकरी लावून देऊ शकतात. मी भाजपमध्ये शहर महामंत्री आहे’, असे प्रदीपने अनुपम यांना सांगितले होते. दरम्यान, २०२३मध्ये अनुपम यांनी कंपनी सोडली. ते अन्य कंपनीत रुजू झाले. २७ जुलै २०२३मध्ये प्रदीप हा अनुपम यांना भेटला. ‘अजय भोयर हा माझ्या जवळचा आहे. त्याचे रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्याच्या मदतीने आपण कोणालाही रेल्वेत नोकरी लावून देऊ शकतो’, असे पुन्हा प्रदीपने अनुपम यांना सांगितले. त्यानंतर प्रदीप हा अनुपम यांना भोयरच्या घरी घेऊन गेला. भोयरने अनुपम यांना रेल्वेत लिपिकपदी नोकरी लावून देण्यासाठी बारा लाख रुपयांची मागणी केली. ऑगस्ट २०२३मध्ये अनुपम यांनी प्रदीपसोबत भोयर याला चार लाख रुपये दिले. त्यानंतर चार लाख रुपये ऑनलाइन त्याच्या खात्यात जमा केले. त्यानंतर नोकरीबाबत अनुपम यांनी भोयरला विचारणा केली. ‘लवकरच काम होईल’, असे तो म्हणाला. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी भोयर हा अनुपम, आकाश लाडके, मंगेश खिरेकर व एका तरुणीला ट्रॅव्हल्सने मुंबईला घेऊन गेला. जे.जे. हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. तीन दिवस अनुपम व अन्य मुंबईत थांबून नागपुरात परतले. २९ ऑक्टोबरला भोयरने पुन्हा अनुपम यांना जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. १ नोव्हेंबर २०२३ रोजी सीवूड रेल्वेस्थानकावर जाऊन भगत नावाच्या व्यक्तीकडून नियुक्तीपत्र घेण्यास सांगितले. अनुपम यांनी त्याच्याकडून नियुक्तीपत्र घेतले. ते नागपुरात परतले. अशाप्रकारे भोयर, प्रदीप व त्याच्या साथीदारांनी अनुपम यांच्याकडून एकूण दहा लाख रुपये घेतले. त्यांना दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे आढळले.



