‘तुम्ही ‘नासा’मध्ये गेल्यानंतर तेथे काय पाहिले, तेथे कोणाला भेटलात, आणखी कोणत्या संस्थांना तुम्ही भेटी दिल्यात,’ यांसारख्या प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर न घाबरता पुणे जिल्हा परिषदेच्या मुलींना थेट उत्तरे दिली. इतकेच नव्हे, तर मुलींनी महात्मा फुले यांच्या विषयीची माहिती जर्मन भाषेतून सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मुलींना दाद दिली.
पुणे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरात राबविलेल्या दोन उपक्रमांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थांच्या (इस्रो) भेटीचा अवकाश अभ्यास दौरा; तसेच एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा उपक्रम राज्यभर राबविण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच अर्थसंकल्पात घोषणा केली. उपक्रमांतंर्गत नासा, इस्रोसाठी ७५ मुला-मुलींना पाठविण्यात आले. त्या संस्थांना भेटी दिलेल्या काही मुलींशी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.
‘नासा’मध्ये काय पाहिले?’
अवकाश केंद्राचा अनुभव कसा होता, तेथे काय पाहिले, अशा प्रश्नांची सरबत्ती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर विद्यार्थिनींनी, ‘आम्ही स्पेस सेंटरला भेट दिली. उपग्रह प्रक्षेपण जवळून पाहिले,’ असे सांगून अनुभव कथन केले. भारतीय राजदूत विनय कोथरा यांच्याशी संवाद साधल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
‘माझे नाव देवेंद्र...’
‘झेडपी’च्या दोन विद्यार्थिनींनी जर्मन आणि फ्रेंच भाषेत संवाद साधून सर्वांचे लक्ष वेधले. ‘नमस्कार, तुमचे नाव काय? माझे नाव देवेंद्र...’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनीही जर्मन भाषेत संवाद सुरू केला. विद्यार्थिनींनी स्वतःची ओळख, शाळेची माहिती आणि महात्मा फुले यांच्या कार्याविषयी जर्मन भाषेत माहिती दिली. त्याचे मराठी भाषांतर अनुवादकांमार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. या संवादाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.तैलचित्राचे अनावरण
महात्मा फुले स्मारकात जाऊन मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले; तसेच तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. शाळा संकुलास भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली. या वेळी पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल बँक’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकासमंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे; तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.



