सुनेत्रा पवार यांची काळजी आम्ही घेऊ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र आल्यास गृहखाते चौकशी करेल. राज्य सरकार सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी घेईल. बारामती पोटनिवडणुकीत काही जण प्रसिद्धीसाठी रिंगणात उभे असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला आहे. खानवडी येथे सीबीएसई शाळेचे उद्घाटन झाले.

governments concern for sunetra pawar chief minister fadnavis clarifies

पुणे : ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र आले असेल, तर त्याची राज्याचे गृहखाते चौकशी करील; तसेच सुनेत्रा पवार यांची राज्य सरकार पूर्ण काळजी घेईल. पत्राबाबतही चौकशी केली जाईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

बारामतीच्या पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांनी अर्ज माघारी घेऊन सहकार्य केले असले, तरी काही जण प्रसिद्धीसाठी रिंगणात उभे असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्य सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त उपक्रमांना सुरुवात केली याचा आनंद आहे. खानवडी येथे जिल्हा परिषदेने अतिशय सुंदर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) शाळा तयार केली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही शाळा तयार केली आहे. विविध प्रकारच्या प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. कंपन्यांनी शाळेत येण्यासाठी मुलींना सायकली दिल्या आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, यासाठी राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न सुरू झाले आहेत याबाबत विचारता, ‘महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. देशात महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोघेच महात्मा आहे. कोणताही सर्वोच्च पुरस्कार मिळणे हे चांगलेच आहे; पण त्यांचे व्यक्तिमत्व हे पुरस्कारापेक्षा मोठे आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध न होण्यास ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांना ‘थोडी प्रसिद्धी मिळावी’ अशी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.