अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर शत्रूदेशांची कोंडी करण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. या जलमार्गावर कोणी आक्रमण करू नये, यासाठी इराणने त्यामध्ये सुरुंग पेरले. आता हेच सुरुंग सामुद्रधुनी खुली करण्यात मोठा अडथळा ठरत आहेत. पेरलेले सर्व सुरुंग शोधून निष्क्रिय करणे तांत्रिक कारणास्तव इराणला शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.
सदोष नकाशांकन (मॅपिंग) आणि प्रवाहामुळे वाहून गेलेल्या उपकरणांमुळे भूसुरुंगाचा शोध घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जहाजवाहतूक लवकर पूर्ववत होणे अशक्य असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे हा शांतता चर्चेतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चेत तो सध्या केंद्रस्थानी आहे. सामुद्रधुनी तातडीने खुली करून अधिकाधिक जहाजांना परवानगी देण्याची मागणी अमेरिकेने इराणला केली आहे; परंतु ‘तांत्रिक’ मर्यादांमुळे संपूर्ण जलमार्ग खुला करणे शक्य नसल्याचे इराणने कळवले आहे. सामुद्रधुनीत पेरलेले सुरुंग सापडत नसल्याने व या जलमार्गाच्या सुरक्षेची हमी देत येत नसल्यानेच इराणने ही सबब दिली असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२८ फेब्रुवारीला हल्ले सुरू झाल्यानंतर इराणने लहान बोटींचा वापर करून होर्मुझच्या सामुग्रधुनीत सुरुंग पेरले. त्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने याबाबत धोक्याचा इशारा दिला. परिणामी, तेलवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाली आणि तेलाच्या किंमती वाढल्या.



