भक्कम बचाव हेही आक्रमणच

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई इंडियन्सचे फलंदाजांचे प्रशिक्षक किएरॉन पोलार्ड यांनी जसप्रीत बुमराहच्या धावा रोखण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. बुमराहने सलग तीन सामन्यात विकेट्स घेतल्या नसल्या तरी धावा रोखण्यात तो यशस्वी ठरला आहे. पोलार्ड यांच्या मते, भक्कम बचाव हेही एक प्रकारचे आक्रमणच आहे. बुमराह तंदुरुस्त असून लवकरच विकेट्स घेण्यास सुरुवात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

jasprit bumrahs strong defense and the attack game

जसप्रीत बुमराहने आयपीएल टी-२० क्रिकेटच्या नव्या मोसमात सलग तीन सामन्यात विकेट घेतलेली नाही. मात्र त्याने धावा रोखण्यात प्रामुख्याने यश मिळवले आहे. हाच मुद्दा जास्त अधोरेखीत करताना मुंबई इंडियन्सचे फलंदाजांचे प्रशिक्षक किएरॉन पोलार्ड यांनी ‘भक्कम बचाव हेही एक प्रकारचे आक्रमणच असते,’ अशी टिपणी केली.

नव्या मोसमात पाहुणा संघ म्हणून ‘मुंबई’ने सलग दोन सामने गमावले आहेत. आता ते पुन्हा आज, रविवारी घरच्या मैदानात खेळणार आहेत. ‘सध्याचे आयपीएल पाहिलेत तर पॉवरप्लेमध्ये शंभरच्या गतीने चेंडू फटकावला जात आहे. या स्थितीत भक्कम बचाव हेही आक्रमणच होते. त्यामुळे बुमराहने विकेट घेतल्या नसल्या तरी त्याची आम्हाला चिंता नाही. त्याने उच्च क्षमता सातत्याने सिद्ध केली आहे. तो लवकरच विकेट घेण्यास सुरुवात करेल,’ असा विश्वास पोलार्ड यांनी व्यक्त केला.

गेला मोसम लक्षात घेतल्यास बुमराहने सलग चार आयपीएल लढतीत विकेट घेतलेल्या नाहीत, तसेच गेल्या सामन्यात त्याचा माराही पुरेसा वेगवान नव्हता, याकडे लक्षात आणून दिल्यावर पोलार्ड काहीसे आक्रमक झाले.

‘अनेक जण खूपच आकड्यांचा खेळ करतात. एखाद्याचा वेग किती, त्याच्या विकेट किती सामन्यात आहेत, याकडे जास्त लक्ष दिले जाते. मला विचाराल तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एखाद्याच्या कामगिरीचा संघाला त्यावेळच्या परिस्थितीत किती फायदा होतो, हे महत्त्वाचेे. बुमराह तंदुरुस्त आहे. तो जोषात मारा करीत आहे. हे मोलाचे आहे. त्याने सर्वांचे समाधान करण्यासाठी पाच विकेट घेतल्या तर चांगलेच,’ अशी टिपणी त्यांनी केली.