खोमदेव हा दिवसा एकदम शांत असायचा. रात्र होताच तो विक्षिप्त व्हायचा. महिला व तरुणींची छेड काढण्यासाठी तो स्वतःची मोटारसायकल वापरत नव्हता. नातेवाईक, मित्र किंवा पत्नीची मोपेड घेऊन घरून निघायचा. पोलिसांची नाकेबंदी अथवा गस्त कुठे आहे याची संपूर्ण माहिती घ्यायचा. त्यानंतर तो संधी साधून महिला किंवा तरुणींची छेड काढायचा अथवा त्यांच्यासमोर अश्लील कृत्य करत होता, अशी माहिती त्याच्या चौकशीदरम्यान समोर आली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्याची कारागृहात रवानगी केली.
महिला व तरुणींशी अश्लील चाळे व त्यांच्यासमोर अश्लील कृत्ये करून फरार होणारा कुख्यात खोमदेव अखेर प्रतापनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
खोमदेव ऊर्फ कार्तिक फुलसिंग पटले (वय २८, रा. एमआयडीसी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो वाहनचालक असून, विवाहित आहे. कधी कधी तो ‘स्विगी’साठी डीलिव्हरी देण्याचेही काम करतो. गेल्या महिनाभरात खोमदेवने एमआयडीसी, प्रतापनगर व बजाजनगर परिसरात अनेक महिलांची छेड काढत त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केले. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून २५वर्षीय तरुणी मैत्रिणीसह मोपेडने घरी जात होती. खामल्यातील लंडन स्ट्रीट परिसरात मोपेडने खोमदेव तरुणीजवळ आला. त्याने गाडीला लाथ मारून तरुणीला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तरुणी खाली पडली नाही. खोमदेवने तिच्यासमोर अश्लील चाळे केले व पसार झाला. तरुणीने प्रतापनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोडसे, निरीक्षक नितीन चरडे, साहाय्यक निरीक्षक अमोल तांबे, उपनिरीक्षक सतीश भोले, हेडकॉन्स्टेबल एकनाथ पाटील, शुभांगी धावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ११ घटना घडल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. खोमदेवची ओळख पटली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात एकूण ११ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.



