कोलकाता : ‘निवडणूक आयोगाच्या साह्याने माझ्याविरोधात दोन चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून भवानीपूर येथील माझी उमेदवारी रद्द करण्याचा भाजपचा डाव होता. मात्र, आम्ही त्यांचा डाव उधळून लावला,’ असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.
पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील केशियारी येथील प्रचारसभेत बोलताना ममता यांनी भाजपच्या कुटिल डावपेचांवर भाष्य केले. ‘लोकशाही मार्गाने थेट दोन हात करण्याची भाजपमध्ये हिंमत नसल्याने ते गैरमार्गाने सत्तेत येऊ पाहात आहेत. भवानीपूर येथील मतदारसंघात माझी उमेदवारी रद्द कशी ठरेल, याचा डाव त्यांनी निवडणूक आयोगाच्या साह्याने आखला होता. मात्र, तृणमूलचे कार्यकर्ते आणि मतदारांनी हा डाव उधळून लावला,’ असे ममता म्हणाल्या. ‘गैरमार्गाने निवडणूक जिंकता यावी यासाठी त्यांनी मतदारयाद्यांतून मतदारांची नावे गायब केली. आता ते ईव्हीएममध्ये फेरफार करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोपही ममता यांनी केला. ‘मतदार भाजपला लवकरच धडा शिकवतील,’ असेही ममता यांनी नमूद केले.



