महापालिकेकडून तीन कोल्ड वॉर्ड सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर शहरात तापमान वाढत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता, महापालिकेने तीन रुग्णालयांमध्ये विशेष कोल्ड वॉर्ड सुरू केले आहेत. येथे २४ तास डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांसाठी हिट अक्शन प्लॅन तयार आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. आगामी काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

nagpur municipal corporation launches three state of the art cold wards

नागपूर : शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून आगामी काळात तापमानाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मनपा रुग्णालयांत तीन कोल्ड वॉर्ड उष्पाघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. या रुग्णालायांमध्ये २४ तास डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

मनपा प्रशासनातर्फे काही दिवसांआधीच नागरिकांसाठी हिट अक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. शहर व परिसरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ४३ अंशांचा पारा ओलांडला होता. यंदा, मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे संभाव्य उष्णतेची लाट पाहता महापालिकेच्या वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने उष्माघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालये, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि आपला दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील तीन उष्माघात कक्षांमध्ये रुग्णांसाठी बेड, कूलर, थंड पाण्याचे व्यवस्थापन, औषधोपचारांसाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासह डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

उष्माघाताची लक्षणे...

मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० अंश सेल्सिअसपर्यंत ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत.