‘प्रादेशिक आणि जागतिक शांतता , स्थैर्यासाठी अर्थपूर्ण परिणाम प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जाण्याकरीता मध्यस्थ म्हणून आपली भूमिका बजावत राहण्याचा निर्धार आम्ही पुन्हा व्यक्त करतो,’ असे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात थेट चर्चा शनिवारपासून सुरू झाली. दोन्ही देशांमधील थेट चर्चेच्या पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर परराष्ट्र कार्यालय निवेदन प्रसृत करण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स करत आहेत. या शिष्टमंडळात विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा समावेश आहे. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष महंमद बाघेर गालिबफ यांनी केले असून, यामध्ये परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची, सर्वोच्च राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे सचिव अली अकबर अहमदीयन आणि केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अब्डोलनासेर हेम्माती यांचा समावेश आहे. इराणच्या शिष्टमंडळात चर्चा करणारे नेते, तज्ज्ञ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसह एकूण ७१ जण आहेत, असे वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिले. चर्चेत इराणने सहभाग घेतल्याबद्दल पाकिस्तानने प्रशंसा केली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इसहाक डार, सैन्य प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि गृहमंत्री मोहसिन रजा नकवी उपस्थित होते.
विमानतळावर स्वागत
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार, लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि गृहमंत्री सय्यद मोहसिन रझा नकवी यांनी नूर खान विमानतळावर दोन्ही शिष्टमंडळांचे स्वागत केले. येथील सरेना हॉटेलमध्ये या चर्चा होणार आहेत. लेबनॉनवरील इस्रायली हल्ले थांबवणे यासह इराणच्या पूर्वअटींची पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी सुरू होणार नाहीत, अशी भूमिका इराणने घेतल्याचे वृत्त आहेे.
निश्चित सहकार्य करणार
‘जर इराण सद्भावनेने वाटाघाटी करण्यास तयार असेल, तर आम्ही निश्चितच सहयोगाचा हात पुढे करू. जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, तर शिष्टमंडळ तितकेही सहनशील नसल्याचे त्यांना दिसेल,’ असा इशारा व्हान्स इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी दिला होता.



