‘राज्यात सुरू असलेल्या लांगुलचालनाच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची वेळ आता आली आहे. सत्तेचे सुकाणू दिले तर समान नागरी कायदा (यूसीसी) तर आणूच शिवाय स्वतःच्याच राज्यात बंगाली लोकांना अल्पसंख्याक ठरू देणार नाही,’ असे ठोस आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगाली मतदारांना दिले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान शनिवारी मुर्शिदाबाद या मुस्लिमबहुल जिल्ह्यातील जांगीपूर येथे आले होते.
‘आमच्यासाठी देशाची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. ही निवडणूक पश्चिम बंगालची अस्मिता, ओळख आणि भविष्य यांच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच राज्यातील लांगुलचालनाचे राजकारण कायमचे संपविण्यासाठी भाजपला पश्चिम बंगालमध्ये यूसीसी लागू करायचे आहे,’असे मोदी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भाजपचा जाहीरनामा जाहीर केला. त्यात यूसीसी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्याचाच पुनरुच्चार पंतप्रधानांनी भाषणात केला.
‘मा-माटी-मानुष अशी घोषणा देत तृणमूल काँग्रेस सत्तेत आले. मात्र, या घोषणेचा त्यांनाच विसर पडला आहे. त्यांना आता घुसखोरांच्या मतांवर सत्ता स्थापन करायची आहे. परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. बंगाली भाषकांना त्यांच्याच राज्यात अल्पसंख्याक ठरू देणार नाही,’ असे मोदी म्हणाले.



