आयपीएल टी-२० क्रिकेटच्या नव्या मोसमात गोलंदाजांचे जास्तच शिरकाण होत आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात जवळपास साडेचारशे धावांचा धूमधडाका झाला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी १२० धावांची धडाकेबाज सलामी दिली. त्यास प्रभसिमरन सिंग, प्रियांस आर्य यांनी ९९ धावांच्या पहिल्या विकेटच्या भागीदारीने उत्तर दिले. त्यानंतर श्रेयस अय्यरने चौकार षटकारांचा धडाका कायम ठेवल्यामुळे ‘पंजाब’ने सहा विकेट आणि सात चेंडू राखून विजय मिळवला.
‘ट्रॅव्हिशेक’ अर्थात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या ‘हैदराबाद’च्या दोन्ही सलामीवीरांना बाद करणाऱ्या शशांक सिंगने ‘पंजाब’ची विजयी धाव घेतली. ३९.५ षटकांत ४४२ धावा झालेल्या या सामन्यात शशांकने त्याच्या तीन षटकांत वीस धावांत दोघांना टिपले. त्याच्या या कामगिरीचा ‘पंजाब’ने दहाव्यांदा दोनशेहून जास्त धावांचा पाठलाग केला, त्यात मोलाचा सहभाग होता.
शशांकसारख्या काही गोलंदाजांची कामगिरी सोडली तर सर्व काही फलंदाजांचेच होते. अभिषेकने सामन्यातील पहिला वैध चेंडू सीमापार पाठवून त्यास सुरुवात केली. त्यामुळे गोलंदाजांची लय बिघडली. अर्शदीपने पाचपैकी चार चेंडू वाईड टाकले, यावरूनच हे अधोरेखीत होते. ‘हैदराबाद’ने त्याच्या पॉवरप्लेमध्ये दोनदा २४हून जास्त धावा केल्या. त्यामुळे शतक ३५ चेंडूतच झाले. शशांकच्या कमी वेगवान चेंडूंनी सलामीची जोडी फोडली. त्यानंतर ‘हैदराबाद’ धावगती कमी होत गेली. पॉवरप्लेमध्ये १०५ धावा केल्यानंतर ‘हैदराबाद’ त्यानंतरच्या १४ षटकांत ११० धावा सहा विकेटच्या मोबदल्यात करू शकले. शेवटच्या पाच षटकांत त्यांनी ३७ धावाच केल्या.
‘प्रभार्या’ने अर्थात प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य या यांनी ‘ट्रॅव्हिशेक’ला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘हैदराबाद’चे गोलंदाजीतील आगळे बदलही त्यांना रोखू शकले नाहीत. त्यांनी पॉवरप्लेमध्ये ९३ धावा केल्या. डावाच्या मधल्या षटकांत श्रेयस अय्यरमुळे धावगती कायम राहिली. अखेर ‘हैदराबाद’च्या १३ षटकार आणि १५ चौकारांपेक्षा ‘पंजाब’चे १६ चौकार व १६ षटकार सरस ठरले.
स्कोअरबोर्ड : सनरायझर्स हैदराबाद ६ बाद २१९ (अभिषेक शर्मा ७४- २८ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकार, ट्रॅव्हिस हेड ३८ - २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार, ईशान किशन २७ - १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार, हेन्रीच क्लासेन ३९ - ३३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार, अनिकते वर्मा १८ - ९ चेंडूंत १ चौकार व १ षटकार, अवांतर १३ - ११ वाईडसह, अर्शदीप सिंग ४-०-५०-२, झेव्हिअर बार्लेट ४-०-४२-१, मार्को यान्सेन ४-०-४०-०, शशांक सिंग ३-०-२०-२, युजवेंद्र चहल ३-०-३३-०) पराभूत वि. पंजाब किंग्ज १८.५ षटकांत ४ बाद २२३ (प्रियांश आर्य ५७ - २० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार, प्रभसिमरन सिंग ५१ - २५ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार, कूपर कॉनॉली ११, श्रेयस अय्यर नाबाद ६९ - ३३ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार, नेहल वाधेरा १४ - १४ चेंडूंत १ षटकार, शशांक सिंग १६ - ९ चेंडूंत १ चौकार व १ षटकार, हर्ष दुबे ४-०-३८-१, हर्षल पटेल २-०-३९-०, शिवांग कुमार ४-०-३३-३).



