मंुबई, सोमवार : घासलेटचे समान वाटप करता यावे, याकरिता प्रत्येक शिधापत्रिकेवर दरमहा पाच लिटर घासलेट देण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबई शहरातील २४ सहकारी ग्राहक संस्थांमार्फत घासलेटचे वाटप होईल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधून मिळणाऱ्या घासलेट तेलाचे समान वाटप करण्याची ही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग सोसायटीमार्फत केली जाणार आहे.
घासलेट तेलासाठी शिधापत्रिका सादर केल्यावर दुकानदार पत्रिकेच्या शेवटच्या रकान्यांत घासलेट असे लिहून त्यावर काट मारील. या पद्धतीने घासलेटचे समान वाटप होईल व ते खऱ्याखुऱ्या ग्राहकांना मिळून ते साठवून ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसेल, असे त्या संबंधींच्या सरकारी पत्रकात म्हटले आहे. सरकारने इतर तेल कंपन्यांना व त्यांच्या घटकांना याच पद्धतीचा अवलंब करण्याची विनंती केली आहे. ग्राहकांना यापेक्षाही अधिक तेल देण्याचे दृष्टीनेही विचार करण्यात येत आहे, अशीही माहिती या पत्रकात दिली आहे.
(१२ एप्रिल १९६६)



