‘ वडगाव खुर्द परिसरातील रेडीमिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्प चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे प्रदूषण आणि अपघातांच्या घटना वाढत आहेत. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकल्प तातडीने येथून स्थलांतरित करावेत,’ अशी सूचना राज्यसभा खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागातील दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रयेजासिटी परिसरातील आरएमसी प्रकल्पांची पाहणी केली. गणेश पिंपळे, प्रीतेश चांडगे, पवन मोकाशी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र पाटील, शर्मिला नाखारे, स्वाती टिळक आदी उपस्थित होते.
या वेळी संबंधित प्रकल्पांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. याबाबत अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महापालिका, पोलिस, नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानंतर प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी येथील प्रकल्प बंद करून स्थलांतरित करावेत, अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या.



