रमेशबाबू वैशालीने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील आपली आघाडी भक्कम केली. तिने सायप्रसला सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी स्पर्धेच्या अकराव्या फेरीत अलेक्झांड्रा गॉर्याचकिनाचा पराभव केला. काळे मोहरे असतानाही वैशालीने ही लढत जिंकण्यात यश मिळवले.
दहाव्या फेरीअखेर वैशालीने अन्य स्पर्धकांना किमान अर्ध्या गुणाने मागे टाकले होते. तिचे आता ६.५ गुण आहेत. अकराव्या फेरीपूर्वी संयुक्त दुसरी असलेल्या झु जिनेर हीने विजयाची संधी नसतानाही दिव्या देशमुखविरुद्ध लढणे कायम ठेवले आहे. दहाव्या फेरीअखेर संयुक्त दुसरी असलेल्या ॲना मुझीचुकची लढत बरोबरीत सुटली आहे. त्यामुळे वैशालीने ॲनावर एका गुणाची आघाडी घेतली आहे.
लंडन सिस्टीम या प्रकाराने सुरुवात करणाऱ्या अलेक्झांड्राला आपल्या राजावर हल्ला करण्यापासून वैशाली ने रोखले. त्यावेळी तिचा संयम जबरदस्त होता. पांढरे मोहरे असूनही वर्चस्व न मिळाल्याने अलेक्झांड्राला मोहरामोहरी करणे भाग पडले. मोहऱ्यांची अदलाबदल होत होती तशी वैशालीच्या परिस्थिती सुधारत गेली. दहाव्या फेरीत दिव्याविरुद्ध जिंकून आपला पहिला विजय मिळवणारी अलेक्झांड्राची बाजू सरस असल्याचे संगणकीय कार्यक्रम दाखवत होता. मात्र वैशाली शांत होती. तिने हुशारीने चाली करीत अलेक्झांड्रावर दडपण आणले. त्याच दडपणाखाली अलेक्झांड्राची ३०व्या चालीत चुक झाली. तिचा हत्ती पटाच्या मध्यभागी अडकला आणि वैशालीने आपली पकड प्रत्येक चालीगणिक घट्ट केली आणि अलेक्झांड्राने ४५व्या चालीनंतर हार पत्करली.
दिव्या देशमुख विश्रांतीमुळे सावरलेली होती. लागोपाठच्या दोन पराभवांनंतर तिने काळे मोहरे असतानाही खंबीर खेळ केला. सर्व काही सुरळीत चाललेले असताना वैशाली जिंकते आहे हे पाहून झू जिनेरने धोका पत्करायचा निर्णय घेतला. दिव्याने ती संधी सोडली नाही आणि वरचष्मा मिळवला. ही लढत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रज्ञानंदची अकराव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली आहे.



