नागपूर : पार्सल न देताच पसार होण्याबाबत विचारणा केल्याने संतप्त झोमॅटो बॉयने डॉक्टरवर हल्ला केला. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौकातील उत्कर्ष उमंग अपार्टमेंटसमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी झोमॅटो डीलिव्हरी बॉयविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. डॉ. सचिन मनोहर देव्हारे (वय ४२) असे जखमी डॉक्टरचे तर रासोल महेश गडपायले असे हल्लेखोर झोमॅटो डीलिव्हरी बॉयचे नाव आहे.
गुरुवारी रात्री डॉ. देव्हारे यांच्या पत्नीने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली. रासोल हा ऑर्डर घेऊन अपार्टमेंटसमोर आला. त्याने डॉ. देव्हारे यांच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधून घराचा पत्ता मिळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. देव्हारे पार्सल घेण्यासाठी अपार्टमेंटमधून बाहेर आले. त्यांनी रासोल याला ‘तुम्ही झोमॅटोकडून आहात का’, अशी विचारणा केली. रासोल संतापला. वादावादी झाली. ‘तुम्ही पहिल्या माळ्याची नोंद केली नाही’, असे म्हणत त्याने पार्सल डीलिव्हर्डचा मेसेज केला. पार्सल न देताच तेथून निघायला लागला. ‘पार्सल तर दे’, असे डॉ. देव्हारे त्याला म्हणाले. त्याने डॉ. देव्हारे यांना धक्का दिला, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जवळच्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केला व पसार झाला. उपचारानंतर डॉ. देव्हारे यांनी धंतोली पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



