‘तृणमूल काँग्रेसने भ्रष्टाचाराद्वारे बंगालच्या जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा भाजप व्याजासह वसूल करेल’, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी येथील प्रचारसभेत बोलताना केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, याकडे त्यांनी मतदारांचे लक्ष वेधले.
जलपायगुडी जिल्ह्यातील उत्तर बंगालमधील राजगंज येथील प्रचारसभेत अमित शहा बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सत्तेतून जाणे निश्चित असून, ही प्रक्रिया सुरू करण्याचे काम राज्याच्या उत्तर भागातूनच सुरू होईल. ‘नरेंद्र मोदी यांनी गुजरातवर १२ वर्षे राज्य केले आणि केंद्रातही ते आणखी १२ वर्षे सत्तेत आहेत; तरीही त्यांच्यावर एक पैशाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही’, असे शहा म्हणाले.
‘बंगालमधील सत्ता भाजपकडे सोपवा. शिक्षक भरती घोटाळ्यात ३०० कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या आणि उत्तर बंगालसाठी केंद्राने मंजूर केलेल्या पूर नुकसानभरपाई निधीतून १०० कोटी रुपये लुटणाऱ्या तृणमूल काँग्रेस नेत्यांवर भाजप कारवाई करेल’, असे शहा यांनी सांगितले.
‘उत्तर बंगाल तीन ‘टी’साठी ओळखला जातो... चहा (टी), लाकूड (टिंबर) आणि पर्यटन (टूरिजम). परंतु ममता बॅनर्जी यांनी चौथा ‘टी’ जोडला आहे. तो म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हातून अपरिमित यातना सहन केलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे अश्रू (टीअर्स)’, असे शहा म्हणाले. उत्तर बंगालकेंद्रित विकास योजनांची घोषणा करताना, शहा म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर भाजप चहाच्या मळ्यांतील कामगारांना जमिनीचे मालकी हक्क देऊन त्यांना भूखंडाचे मालक बनवेल.
दरम्यान, बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोग केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची २४०७ पथके तैनात करणार आहे. सर्वाधिक ३१६ पथकांची तैनाती मुर्शिदाबाद जिल्ह्यात केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय सुरक्षा जवानांवर
ममता यांचा आरोप
इस्लामपूर : एक दिवस कोलकाता विमानतळाकडे जात असताना केंद्रीय दलांनी आपल्या कारची झडती घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला.






