भाजपच्या यशात तावडेंचीही रणनीती

महाराष्ट्र टाइम्स

बिहारमध्ये मोठा भाऊ होण्यासाठी विशेष योगदान

Maharashtra Times

बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी शपथ घेतली असून त्यांच्या या यशात अनेकांचा वाटा असला तरी यात भाजपचे राष्टीय सरचिटणीस, महाराष्ट्रातील नेते आणि खासदार विनादे तावडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. पक्षाने तावडे यांना तिकीट नाकारल्यानंतरही पक्षासाठी आणि पक्षातील इतर नेत्यांना मोठे करण्यासाठी तावडे यांनी मिशन मोडवर काम केल्याची आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

सप्टेंबर २०२२मध्ये जेव्हा विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा भाजप तिथे सत्तेबाहेर होता. जानेवारी २०२४ मध्ये नितीश कुमार यांनी 'महाआघाडी' सोडून पुन्हा भाजपसोबत येण्याचा जो निर्णय घेतला, त्यामागे तावडे यांनी पडद्यामागून केलेली यशस्वी शिष्टाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांनी अत्यंत गुप्तपणे चर्चा करून भाजपसाठी सत्तेचे दरवाजे पुन्हा उघडले. २०२५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे तावडे यांनी या निवडणुकीत सूक्ष्म नियोजन केले होते. प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज्य'ला रोखण्यासाठी एकीकडे प्रशांत किशोर यांच्या प्रभावावर मर्यादा आणल्या तर दुसरीकडे मतदारांचा कल विकासाच्या मुद्द्यावर वळविण्यात यश मिळवले. तावडें यांनी त्यांच्या 'अभाविप'च्या अनुभवाचा वापर करून बिहारमधील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले.

बिहार हे पारंपरिकरित्या जातींवर आधारित राजकारणाचे केंद्र राहिले आहे. तावडे यांनी ही प्रतिमा बदलण्यासाठी जातीच्या पलीकडे विकास ही संकल्पना मांडली आणि ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळेच अतिमागास आणि तरुण मतदारांनी भाजपला मोठी पसंती दिल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यावर, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी तावडे यांनी मित्रपक्षांना विश्वासात घेऊन सम्राट चौधरी यांच्या नावावर एकमत घडवून आणल्याचे सांगितले जाते. यामुळेच बिहारमध्ये अनेक दशके 'छोटा भाऊ' म्हणून राहिलेल्या भाजपचा स्वतःचा मुख्यमंत्री विराजमान होत असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.