नेस्को सेंटरमधील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या तिकिटांचे ‘रेट कार्ड’ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये तीन हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत तिकीट दर दाखविण्यात आला आहे. या रेट कार्डप्रमाणे दर आकारले गेलेत का आणि इतक्या मोठ्या रकमांची तिकीटविक्री करण्यामागील नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करीत आहेत.
नेस्कोमध्ये आयोजित केलेल्या संगीत रजनीची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. तिकिटांची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी दोन्ही प्रकारे करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात इतकी रक्कम आकारली गेली का, याबाबत तपास केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी ११ एप्रिलच्या घटनेनंतर चौकशीचा फास आवळला आहे. अटक आरोपींची कसून चौकशी केली जात असून, आतापर्यंत १६ ते १७ जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, आरोपी आनंद पटेल याने ॲपद्वारे कुरियरने कल्याणहून ड्रग्जच्या गोळ्या पाठविल्या होत्या. या गोळ्या त्याने कुठून आणल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून, काहींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेत असलेला विद्यार्थी प्रतीक पांडे कल्याणचा असून, याच्या मार्फत आनंद इतरांच्या संपर्कात आला.







