भाजप नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ‘बिहारचा कारभार ‘मोदी-नितीश मॉडेल’नुसारच चालवला जाईल’, अशी ग्वाही चौधरी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली. चौधरी यांच्याव्यतिरिक्त, ‘जेडीयू’चे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनीही मंत्रिमंडळ सदस्य म्हणून शपथ घेतली. या दोघांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.
लोकभवनामध्ये राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एक दिवसापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले ‘जदयू’चे अध्यक्ष नितीश कुमार, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच बिहारमधील सत्ताधारी ‘एनडीए’चा तिसरा सर्वांत मोठा घटक पक्ष असलेल्या ‘एलजेपी’चे (आरव्ही) प्रमुख चिराग पासवान आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. ‘चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारची वेगाने प्रगती होईल’, असा विश्वास व्यक्त करत ‘एनडीए’च्या नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. अनेक वर्षे दुय्यम स्थानावर राहत संयमाने राजकीय वाटचाल केलेल्या भाजपचा नेता राज्यातील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘चौधरी यांची ऊर्जा, लोकसेवेप्रति असलेली निष्ठा आणि तळागाळात काम करण्याचा अनुभव राज्यासाठी अत्यंत हितकारक ठरेल’, असे मोदी यांनी ‘एक्स’वर नमूद केले.






