मंदिराच्या छताचा भाग कोसळला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिराचा काही भाग कोसळला. सुदैवाने, मंदिरातील कुंड स्वच्छ करणारे युवक थोडक्यात बचावले. हे पुरातन मंदिर काळ्या दगडांनी बांधलेले असून, त्याची अवस्था सध्या खराब आहे. पुरातत्त्व विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मंदिराच्या छताचा भाग कोसळला

सातारा : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा काही भाग रविवारी अचानक कोसळला. सुदैवाने गोमुखाखालील कुंडाची स्वच्छता करत असलेले स्थानिक युवक थोडक्यात बचावले.

महाबळेश्वर मुख्य मंदिरापासून जवळच असलेले कृष्णाबाई मंदिर पुरातन असून, येथून कृष्णा नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून, त्यावरील कोरीवकाम, भव्य गाभारा, नक्षीकाम केलेले खांब व छतावरील शिल्पकला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरासमोर गोमुख व कुंड असून, त्यातून सतत पाणी वाहत असते. परिसरातून धोम व बलकवडी धरणाचे विहंगम दृश्य दिसते. अलीकडच्या काळात येथे पर्यटकांची संख्या वाढत असली, तरी मंदिराची अवस्था मात्र अत्यंत खराब झाल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी येथील दादासाहेब लोंढे, अमित झाडे, सौरभ गोळे व सौरव साळेकर हे मंदिरासमोरील गोमुख खालील कुंडामध्ये साचलेला गाळ काढून स्वच्छता करत होते. त्याच वेळी मंदिराच्या छताचा एक भाग अचानक कोसळून थेट कुंडामध्ये कोसळला. सुदैवाने युवक थोडक्यात बचावले. पुरातत्त्व विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.