पुणे : पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार’ ‘पुढारी’च्या ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना बुधवारी जाहीर झाला. शहर विभागातून मीनाक्षी गुरव (सकाळ), ग्रामीण विभागातून दीपक कांबळे (दिव्य मराठी) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागातून कमलेश सुतार (झी चोवीस तास) यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला.
मित्र मंडळाचे विश्वस्त डॉ. सतीश देसाई आणि ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. २९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे प्रमुख पाहुणे असतील.
दर वर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन पदविकेच्या सन २०२३-२४ च्या अंतिम परीक्षेत पहिला क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला गौरविण्यात येणार आहे.







