राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात याला तब्बल १७७ फोन कॉल केले आहेत. त्यात एक कॉल हा २२ मिनिटांचा असून, खरात याचा फोन बंद होईपर्यंत हे संभाषण सुरू होते, असा दावा अंजली दमानिया यांनी बुधवारी केला. जवळपास एक महिना उलटूनही चाकणकर यांची चौकशी का झाली नाही; खरे तर त्यांना आतापर्यंत अटक व्हायला हवी होती, असेही त्या म्हणाल्या.
खरात प्रकरणात दमानिया यांनी सीडीआर जाहीर करून राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. खरात यांच्याशी राजकारणी, अधिकारी संपर्कात असल्याचा दावा दमानिया यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.
‘अशोक खरात एकट्याने मोठा झालेला नसून त्याच्या पाठीशी राज्यातील मोठे राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ होते. त्याच्याशी संपर्कात असलेल्या लोकांच्या यादीत रूपाली चाकणकर यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल; तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, त्यांचे स्वीय सहायक मंगेश देशपांडे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (मंत्री दादा भुसे यांचे स्वीय सहायक), राहुल कोतडे (मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी) यांचाही समावेश आहे,’ असे त्या म्हणाल्या.
या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचेही नाव असल्याचे त्या म्हणाल्या.
‘या सर्व व्यक्ती खरातच्या संपर्कात का होत्या, याची चौकशी व्हायला हवी. खरात यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांची चौकशी झाली तर मोठे षड्यंत्र उघड होईल, कदाचित त्यामुळेच त्यांना अभय दिले जात असावे,’ अशी शक्यता दमानिया यांनी व्यक्त केली.
‘अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी खरात ठाण्यात होते. अपघाताच्या तसेच त्याच्या आसपासच्या दिवसात खरात यांच्याशी संबंध असलेल्या समता पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला,’ असा दावा दमानिया यांनी केला.







