दीड महिन्यात उष्माघाताचे १७ रुग्ण

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. १ मार्च ते १५ एप्रिल या दीड महिन्यात उष्माघाताचे १७ रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे सुचवले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

17 heat stroke patients health department issues important advisories

राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने आता उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. राज्यात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले असून, जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढत असून, अनेक ठिकाणी तो ४० अंशांपुढे गेला आहे. दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विशेषतः उन्हात दीर्घ काळ काम करणारे मजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, शेतकरी; तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्व जिल्ह्यांमध्ये औषधे आणि आवश्यक उपायोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या काळात उष्माघात प्रतिबंध व उपचाराकरिता जिल्हा आणि महापालिका स्तरावर ‘कोल्ड रूम’ सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.

स्नायूंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी, सतत उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी कमी होणे, जास्त घाम येणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.