नगरच्या चौघांनाअग्निशमन पुरस्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहिल्यानगरच्या अग्निशमन दलातील चौघांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने हे पुरस्कार दिले आहेत. याशिवाय, नगरमध्ये एका कापड व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक झाली आहे. साताऱ्यात कासजवळ एका व्यक्तीचा सांगाडा सापडला. फलटणमध्ये एका ११ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

four firefighters from ahmednagar receive national award

अहिल्यानगर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या महानिदेशालय (अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) यांच्या वतीने ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’च्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार मिळालेल्या राज्यातील २८ कर्मचाऱ्यांपैकी चार जण अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत आहेत. याबाबतची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. अहिल्यानगर अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर उत्तम मिसाळ (चीफ फायर ऑफिसर), वाहनचालक चिंधू राघू भांगरे (ड्रायव्हर ऑपरेटर), आणि अग्निशमन मदतनीस (फायरमन हेल्पर) भरत अशोक पडगे; तसेच रवींद्र गोविंद साठे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

४५ लाखांना फसवले

अहिल्यानगर : पुण्यातील कापड व्यावसायिक अमोल दत्तात्रय येमूल (वय ४४, रा. टिळक रस्ता, पुणे) यांची नगरमधील दुकानातील कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येमूल यांचे नगरच्या सर्जेपुरा भागात ‘पेशवाई श्रीमंत’ नावाचे कापड दुकान आहे. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बनावट बिले तयार करून ही फसवणूक केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. येमूल यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या आत्याचा मुलगा प्रशांत राजाराम बल्लाळ, राजेंद्र कराळे, आदित्य रमेश परदेशी, रमेश परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कासजवळ सांगाडा

सातारा : कासजवळील डोंगरावरील जंगलात दुपारी लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस गळफास लावलेल्या अवस्थेतील मानवी हाडांचा सांगाडा दिसून आला. मेढा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी आधार कार्ड सापडले असून, त्यावर व्यक्तीचे नाव आनंदराव श्रीपती जिमन (रा. राकुसलेवाडी, पो. आसनगाव) असे असल्याचे समजले. चौकशी केली असता, ही व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरून नातेवाइकांना बोलावून सांगाडा ताब्यात देण्यात आला.

विहिरीत बुडून मृत्यू

सातारा : मठाची वाडी (ता. फलटण) येथे एका अकरावर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. ओम राजेंद्र सस्ते (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो सहावीत शिकत होता. सस्तेवस्तीवर तो राहण्यास होता.