वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न करता त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
सय्यदनगर, हडपसर येथील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत तक्रार दिली. संबंधित मुलाने आई-वडिलांचा सांभाळ केला नसून, न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले. हा प्रकार २०१९ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान सुरू होता. या प्रकरणी नुकताच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदारांनी आपल्या व वृद्ध पत्नीच्या पालनपोषणासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने मुलाला दरमहा १० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेश असूनही त्याचे पालन करण्यात आले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ‘ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७’च्या कलम २४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : कात्रज परिसरात कौटुंबिक वादातून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरे आणि दीर यांच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिलला सायंकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. महिलेच्या २६ वर्षीय नातेवाइकांकडून तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलिस करत आहेत.







