शिष्यवृत्ती परीक्षेस ५४ हजार विद्यार्थी

महाराष्ट्र टाइम्स

राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. जिल्ह्यातील ३५८ केंद्रांवर ५४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आहे. पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. चौथीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी ५ हजार रुपये तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये मिळतात.

शिष्यवृत्ती परीक्षेस ५४ हजार विद्यार्थी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीसाठी ही परीक्षा घेतली जात होती. २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवीसाठी ती घेण्यात येत आहे. नव्या धोरणानुसार यंदा ही परीक्षा दोन वेळा आयोजित करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे. पाचवी व आठवीची परीक्षा २२ फेब्रुवारी रोजी पार पडली होती.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (२६ एप्रिल) इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ३५८ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. दोन्ही सत्रांत एकूण ५४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; तर ५३१४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.

परिषदेच्या वतीने जिल्ह्यात परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी व्यापक नियोजन करण्यात आले होते. चौथीसाठी १८८ परीक्षा केंद्रे; तर सातवीसाठी १७० परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. ही परीक्षा दोन सत्रांत पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत भाषा व गणित या विषयांचा पेपर झाला. तर दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा (इंग्रजी) आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर घेण्यात आला. दोन्ही पेपर प्रत्येकी ७५ गुणांचे होते. यंदा जिल्ह्यात चौथी आणि सातवीच्या परीक्षेसाठी तब्बल ५९ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये चौथीच्या परीक्षेसाठी ३३ हजार ७३० तर सातवीच्या २६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ४८१ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. यामध्ये चौथीचे सुमारे ३० हजार ९०९; तर इयत्ता सातवीच्या २३ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५ हजार ३१४ जण परीक्षेला गैरहजर होते. राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ करणे हा या शिष्यवृत्ती परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.

परीक्षेनंतर जाहीर होणाऱ्या निकालात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी ५ हजार रुपये; तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती सलग तीन वर्षे दिली जाते. या परीक्षेसाठी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी पात्र आहेत.