हज यात्रेसाठी इच्छुकांच्या अर्जातून लॉटरी पद्धतीने हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची निवड करण्यात येते. यामध्ये प्रतीक्षा यादीही असते. जागा उपलब्ध झाल्यास प्रतीक्षा यादीतील भाविकांना जाण्याची संधी मिळते. काही राज्यांना दिलेल्या कोटा पद्धतीनुसार प्रवासी उपलब्ध होत नाहीत किंवा ज्यांचा नंबर लागला आहे, असे काही जण ऐन वेळी प्रवास रद्द करतात. रिकाम्या सीटचा कोटा देशभरात सर्वांत जास्त प्रतीक्षा यादी असलेल्या राज्यांना वाटप करण्यात येतो. ऐन वेळी कोटा जाहीर झाल्याने शहरासह जिल्ह्यातील १०० ते १५० जणांचा हज यात्रा २०२६ ला नंबर लागला आहे.
शहर आणि जिल्ह्यातून सौदी अरब येथे हज यात्रेला जाणाऱ्या भाविक ांची यात्रा सुरू झाली आहे. यंदा शहर आणि जिल्ह्यातून जाणारे भाविक मुंबईहून रियाधला जात आहे. आतापर्यंत एक हजार ३०० पेक्षा अधिक हाजी हज यात्रेसाठी गेल्याची माहिती हुज्जाज कमिटीकडून देण्यात आली आहे.
वर्ष २०२६ मधील हज यात्रेला आगामी काही दिवसात सुरवात होणार आहे. या हज यात्रेसाठी शहर आणि जिल्हयातून अनेकांनी अर्ज भरला. हज कमिटी ऑफ इंडियाकडून काढण्यात आलेल्या सोडतीत यंदा हज यात्रेला निवडलेल्या भाविकांची यादी जाहीर करण्यात आली. हज यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी अर्ज भरताना इम्बारकेशन पॉइंटची नोंद केली होती. साधारणत: तीन ते चार वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर इम्बारकेशन पॉइंट निवडलेल्या हज यात्रेकरूंना मुंबईपेक्षा जास्तीची रक्कम भरावी लागली होती. यामुळे यंदा अनेकांनी मुंबईहून सौदीला प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाही छत्रपती संभाजीनगर येथून एकही आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार नाही, हे निश्चित झाले आहे.
हज यात्रेला जाणाऱ्या हाजींना यंदा त्यांच्या विमानाचे तिकीट बुक करण्याची संधी देण्यात आली होती. भाविकांनी मुंबई हून त्यांच्या सोयीच्या दिवसाचे तिकीट बुक केले. हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे एकत्रित जत्थे शहरातून निघालेले नाही. भाविकांनी मुंबईसाठी स्वत:ची सोय केली. शहरातून भाविक मुंबई हज हाऊसला एक दिवस आधी रिपोर्टिंग करीत आहे. येथे यात्रेकरूंच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हज यात्रेकरूंना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात येत आहेत. आगामी काही दिवसांत शहरातून आणखी काही प्रवासी हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती अशी माहिती हुज्जाज कमिटीकडून देण्यात आली आहे.





