मोहता यांना १० वर्षे सक्तमजुरी

Contributed by(आमच्या वार्ताहराकडून)|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अकोल्यातील लक्ष्मी बँक अफरातफर खटल्याचा निकाल लागला. बँकेचे अध्यक्ष गोपालदास मोहता यांना १० वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड झाला. काँग्रेस आमदार मनोहर भाई पटेल यांनाही शिक्षा सुनावण्यात आली. एकूण ५७ पैकी ४४ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. ५७ लाखांहून अधिकची अफरातफर सिद्ध झाली.

akola bank scam case mohata sentenced to 10 years in prison

अकोला, दि. २६ : येथील लक्ष्मी बँक अफरातफर खटल्याचा निकाल आज लागला. बँकेचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर गोपालदास बुलाखीदास मोहता यांना जास्तीतजास्त म्हणजे १० वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड आणि दंड न दिल्यास दोन वर्षे जादा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

गोंदियाचे प्रसिद्ध उद्योगपती व महाराष्ट्र विधानसभेचे काँग्रेस आमदार मनोहर भाई बाबरभाई पटेल यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाचीआणि ४७७-अ अन्वये सहा आरोपांखाली प्रत्येकी एक महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ॲडिशनल सेशन्स जज्ज जी. के. पाटणकर यांनी ५७ पैकी ४४ आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावल्या. त्या सर्वांना जामीनावर सोडण्यात आले. ५७ लाख ९९ हजारांची अफरातफर होती; पण त्यापैकी ४३ लाख ९५ हजारांची प्रत्यक्ष तूट तेवढी सिद्ध करता आल्याचे पाटणकर यांनी निकालपत्रात म्हटले आहे.