‘स्मार्ट सिटी’च्या अस्तित्वासाठी धडपड

महाराष्ट्र टाइम्स

स्मार्ट सिटी मिशन ३० एप्रिल रोजी संपले आहे. या मिशन अंतर्गत झालेले प्रकल्प आता महापालिकेकडे हस्तांतरित होतील. मात्र, स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेले विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कायम ठेवण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. एसपीव्हीची पुन्हा नोंदणी करण्यासाठी मोठा खर्च येऊ शकतो. त्यामुळे हा खर्च वाचवण्यासाठी आणि शहर विकासासाठी एसपीव्ही कायम ठेवण्याची विनंती राज्य व केंद्र सरकारला केली जाईल.

municipal efforts for the existence of smart city

स्मार्ट सिटीच्या पॅकअपनंतर ‘ एसपीव्ही ’ (विशेष उद्देश वाहन) कायम ठेवण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. एसपीव्हीच्या माध्यमातून येत्या काळात विविध कामे करता येतील , शिवाय एसपीव्हीच्या नोंदणीसाठीचा खर्च देखील वाचेल असे मानले जात आहे.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी मिशन ३० एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेले सर्व प्रकल्प त्या त्या महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश देखील शासनाने दिले आहेत. त्यानुसार येत्या एक मे पासून छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे राबवण्यात आलेले प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. प्रकल्पांच्या हस्तांतरणाबरोबरच स्मार्ट सिटी मिशनसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही - स्पेशल पर्पज व्हेइकल) बरखास्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. एसपीव्हीचे सर्व अधिकारी पालिका आयुक्तांना देण्यात आले असून ‘स्मार्ट सिटी’चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशानुसार ‘स्मार्ट सिटी’ चे सर्व प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित झाले तरी ‘स्मार्ट सिटी’ साठी स्थापन करण्यात आलेली एसपीव्ही कायम राहावी यासाठी पालिकेची यंत्रणा प्रयत्न करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एसपीव्ही नोंदणीसाठी पालिकेला दहा वर्षांपूर्वी ४५ लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. एसपीव्ही बरखास्त झाल्यावर त्याची पुन्हा नोंदणी करण्यासाठी ४५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो, त्यामुळे एसपीव्ही कायम ठेवावी, अशी विनंती पालिकेकडून राज्य व केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. एसपीव्हीच्या माध्यमातून शहर विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवणे, विकास कामांचे डीपीआर तयार करणे आदी कामे करता येईल असे मानले जात आहे.