नव्या इमारतीची चर्चा?

महाराष्ट्र टाइम्स

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल पंचवटी समोरील जागेचा प्रस्ताव दिला आहे. यापूर्वीही शहानुरवाडी आणि मजनुहिल येथील जागांवर विचार झाला होता. मात्र, विविध कारणांमुळे हे प्रस्ताव रखडले. त्यामुळे नवीन इमारतीचा प्रश्न केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे.

discussion about new municipal building has halted

महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी जागेच्या शोधाची केवळ चर्चाच केली जात आहे. नवीन इमारतीसाठी त्या त्या आयुक्तांनी त्यांच्या पसंतीच्या जागा निवडल्या; पण त्या जागाही कागदावरच राहिल्या आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुचविलेल्या जागेवरदेखील अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन इमारत केवळ चर्चेत राहते का असा प्रश्न विचारला जात आहे.

महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभी करा, असा सल्ला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिला. सध्याची इमारत कब्रस्तानच्या जागेत आहे, त्यामुळे बरकत नाही अशा आशयाचे विधानदेखील त्यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नवीन इमारतीची चर्चा सुरू झाली. शिरसाट यांनी नवीन इमारतीसाठी हॉटेल पंचवटी समोरील जागा सुचवली. य

ा जागेवर पालिकेची नवीन इमारत उभी करण्याबाबात दोन दशकांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. परंतु त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. शिरसाट यांनी सुचविलेली जागा पालिकेच्या नवीन इमारतीसाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे मानले जात आहे.

पालिकेचे तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहानुरवाडी येथील जागेवर पालिकेची नवीन इमारत उभारण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली होती. या जागेवर श्रीहरी पॅव्हेलियन एका खासगी विकासकाने पालिकेशी करार करुन उभारले आहे. या पॅव्हेलियनची जागा त्या विकासकाला पालिका फंडातून विशिष्ट रक्कम देऊन परत घेण्यात आली. त्या जागेवर पालिकेची केवळ नवीन इमारत होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पांडेय यांच्या बदलीनंतर या जागेची चर्चा थांबली आहे.

जी. श्रीकांत यांनी पालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यावर मजनुहिलवर पालिकेची बहुमजली नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्राथमिकस्तरावर काम देखील सुरू करण्यात आले. मजुनहिल हा परिसर ऐतिहासिक असल्यामुळे त्यांनी शहरातील नागरिकांच्या आक्षेप - सूचना मागवल्या.

मजनुहिल परिसरात पालिकेची इमारत उभारण्यास अनेकांनी विरोध केला, त्यामुळे जी. श्रीकांत यांना आपला निर्णय बदलावा लागला. त्यानंतर नवीन इमारत उभारण्याबाबतची चर्चा बंद पडली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानामुळे काही दिवस चर्चा सुरू राहिली. आता या चर्चेलादेखील पूर्णविराम मिळाल्याचे चित्र असल्याचे बोलले जात आहे.