विषय समिती सभापतींना मिळेना दालन

महाराष्ट्र टाइम्स

महापालिकेतील विषय समिती सभापतींना अजूनही दालने मिळालेली नाहीत. प्रमुख पदाधिकाऱ्यांना दालने दिल्यानंतरही विषय समिती सभापतींना दालनांची प्रतीक्षा आहे. आयुक्तांची भेट घेऊनही दालने न मिळाल्याने सभापती नाराज आहेत. दालन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही.

विषय समिती सभापतींना मिळेना दालन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महापालिकेतील विषय समितींच्या सभापतींना आयुक्तांच्या भेटीनंतरही दालनांची प्रतीक्षा कायम आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना दालनांचा ताबा मिळाल्यावर विषय समितीच्या सभापतींना दालन केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेत महापौर , उपमहापौर , स्थायी समितीचे सभापती, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता या प्रमुख पाच पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन आहेत. पालिका प्रशासनाने या पदाधिकाऱ्यांना टप्प्या टप्प्याने दालन उपलब्ध करुन दिले. स्थायी समितीच्या सभापतींना तर सभापतीपदी निवड झाल्यावर तब्बल वीस ते पंचेवीस दिवसांनी हक्काचे दालन मिळाले.

विषय समितीच्या सभापतींना देखील पालिका मुख्यालयात स्वतंत्र दालन दिले जाते. पालिकेत पाच विषय समित्या आहेत. त्यात महिला व बालकल्याण समितीला सभापती आणि उपसभापती अशी दोन पदे आहेत. त्याशिवाय आरोग्य समिती, शिक्षण समिती, शहर सुधार समिती, समाज कल्याण समिती या समितींचे सभापती देखील निवडले गेले आहेत. त्यांच्या निवडीला एक महिना होत आला आहे, अद्याप त्यांना दालन मिळालेले नाही. दालन मिळावे म्हणून विषय समितीच्या सभापतींनी आयुक्तांची भेट घेतली. दालन न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतरही विषय समिती सभापतींना दालन मिळालेले नाही.