जालना रस्त्यावरील विमानतळ ते केंब्रिज चौकाचे सुशोभीकरण, डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. या टप्प्यात बोगनवेलीची चार हजार ५०० झाडे तर बॉटलपामची १५० झाडे लावण्यात येत आहेत. जालना शहरापर्यंतच्या रस्त्याची मान्सूनपूर्व कामे सुरू असून खड्डे बुजविणे, साइडपट्ट्या मजबूतीकरणाचा त्यात समावेश आहे.
हा रस्ता बीओटीअंतर्गत आहे. ठरवून दिलेल्या कालावधीपर्यंत रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराकडून केली जाते. या रस्त्यासाठी नेमलेल्या कंपनीकडून रस्ते दुरुस्ती, डागडुजीसाठी वेळापत्रकानुसार काम होत आहे. खड्डे भरणे, जिथे अनधिकृतरीत्या दुभाजक तोडले आहेत, ते बंद करणे, साइडपट्ट्यांची स्वच्छता व मजबुतीकरण, रंगरंगोटी आदी कामांचा समावेश असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले. कंत्राटदार कंपनीकडून रस्ता सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. विमानतळ ते केंब्रिज चौकापर्यंतच्या दुभाजकांमध्ये बोगनवेल, रबर पामची झाडे लावत आहेत. जालना शहरापर्यंतच्या डागडुजी, मजबुतीकरण सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.




