शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची चाचणी सुरू असताना मंगळवारी ढोरकीनजवळ स्क्रोल व्हॉल्व्हचे वेल्डिंग निखळले. त्याची दुरुस्ती बुधवारी होऊ शकली नाही. आज, गुरुवारी दुरुस्तीचे काम होण्याची शक्यता आहे. स्क्रोल व्हॉल्व्हच्या दुरुस्तीची प्रतीक्षा कायम असल्यामुळे जलवाहिनीतून आलेले पाणी शहराच्या वेशीवरच थांबले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीची चाचणी सध्या सुरू आहे. २३ मार्चपासून चाचणी सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३८ किलोमीटर अंतराची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यापैकी मंगळवारी ३६ किलोमीटरपर्यंतच्या जलवाहिनीची चाचणी झाली. नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी केवळ दोन किलोमीटर अंतर राहिलेले असताना मंगळवारी सायंकाळी ढोरकीनजवळ जलवाहिनीवर बसवण्यात आलेल्या स्क्रोल व्हॉल्व्हचे वेल्डिंग निखळले. त्यामुळे पंपिंग बंद करण्यात आले. निखळलेल्या वेल्डिंगमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडू लागले. बुधवारी सायंकाळपर्यंत पाणी आणि गाळ काढण्याचे काम सुरू होते.



