तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुकीस मुदतवाढ देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशने (बामुक्टा) केली आहे.
उच्च शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘प्रचलित नियमानुसार तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या नेमणुका ३१ मार्च रोजी समाप्त करण्यात येतात. तथापी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) पॅटर्ननुसार प्रथम वर्ष पदवी परीक्षांचे आयोजन १६ एप्रिलपासून तसेच द्वितीय वर्ष पदवी परीक्षांचे आयोजन २८ एप्रिलपासून होणार आहे.’ ‘अशा परिस्थितीत, शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करता व विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे सोपविण्यात आलेला अभ्यासक्रम पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या नियमांमुळे ३१ मार्चनंतर त्यांच्या सेवा समाप्त होत असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे ३१ मार्च या कालमर्यादेला तात्पुरते शिथिल करून, एनईपी अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नेमणूक किमान ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याबाबत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निर्देश देण्यात यावेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद आहे. निवेदनावर डॉ. राजेश करपे, डॉ. प्रशांत वनंजे, डॉ. विश्वनाथ कोक्कर, डॉ. गणेश मोहिते आदींच्या स्वाक्षरी आहेत.



