मुंबईजवळील भव्य खडकात कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या घारापुरी म्हणजेच एलिफंटा बेटावरील मोरा बंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन काळातील व्यापार आणि जलव्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत. या बेटावर नौकांचे अँकरिंग आणि मालवाहतुकीशी संबंधित हालचाली होत असाव्यात, याचे पुरावे मिळाले आहेत. उत्खननात रोमन अम्फोरा भांड्यांचे तुकडे, पश्चिम आशियातील टॉरपीडो जार, फिरोजी ग्लेझ वेअर तसेच पोर्सेलिन आढळून आले आहेत. यामुळे या बेटाचे रोम, पश्चिम आशिया आणि इतर प्रदेशांशी प्राचीन व्यापारसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून घारापुरी बेटावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई विभागाच्या वतीने उत्खनन सुरू आहे. यात डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. येथील उत्खननात प्राचीन जलाशय सापडला आहे. त्यावरून खडकाळ बेटावरील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रगत जलव्यवस्थापन तंत्रज्ञान वापरले जात होते, हे समोर आले आहे. येथे कालचुरी आणि क्षत्रपकालीन नाणीही सापडली आहेत.
या उत्खननातील दोन मोठ्या साठवण भांड्यांचा शोध विशेष लक्षवेधी ठरला आहे. यापैकी एक भांडे सुमारे १.२५ मीटर उंच असून दुसऱ्या तुटलेल्या भांड्याचा व्यास सुमारे १.२२ मीटर आहे. ही भांडी गोदामांसारख्या संरचनांच्या जवळ सापडल्याने ती माल साठवण्यासाठी वापरली जात असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर अम्फोरा व टॉरपीडो जारचे तुकडे, लोखंडी सळई आणि दगडी अँकरही सापडले आहेत.
या बेटावर विटांनी बांधलेली आणि खडकात कोरलेली दोन पाण्याची टाकी आढळली असून, त्यांचा वापर कापड रंगवण्याच्या प्रक्रियेत होत असावा, असे मानले जात आहे. यावरून या ठिकाणी कापड रंगवण्याचा उद्योगही अस्तित्वात असल्याचे संकेत मिळत आहेत. या निष्कर्षांमुळे इ.स. चौथ्या ते पाचव्या शतकातील दीर्घ पल्ल्याच्या व्यापाराची माहिती उलगडत आहे



