आराखडा तयार होऊनही शहरातील पाणी पुरवठ्याचा गॅप जैसे थे आहे. गॅप कमी करण्याच्या महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशाकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे , त्यामुळे उन्हाळ्यातही नागरिकांना सहा ते आठ दिवसांनीच पाणी मिळणार का असा प्रश्न आहे.
समीर राजूरकर यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन विषयात प्राधान्याने लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते. उन्हाळा लक्षात घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिले. गॅप कमी करण्याबद्दलचा आराखडा २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारीच्यानंतर तीन - चार दिवसांनी महापौरांना आराखडा सादर केला. आराखडा सादर केल्यावर महापौरांनी पाणी वितरणाच्या पध्दतीत काही सुधारणा करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. सुधारणा करुन पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करा, उन्हाळ्यात नागरिकांना त्रास होऊ देऊ नका असे आदेशदेखील त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याचा आराखडा अधिकाऱ्यांनी महापौरांना सादर केल्यावर अद्याप गॅप कमी झालेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आराखडा सादर करुन मोकळे झाले का, गॅप कमी करण्याच्या महापौरांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.



