गाळ काढण्यास प्राधान्य द्या

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील नाले आणि मिठी नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत नालेस्वच्छता शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. कचरा आणि गाळ काढण्यावर भर दिला जात आहे. जलवाहिनीच्या जोडण्या सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दादर धारावी नाल्यातील तरंगत्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

municipal corporations commitment to clean mumbais drains

मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात तसेच मुंबईतील लहान-मोठ्या नाल्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्या परिसरातील कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा. या कामासाठी कालबद्ध नियोजन करून ३१ मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील नालेस्वच्छता शंभर टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील नाले आणि नद्या यांतून गाळ उपसा करून स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नाला स्वच्छतेबरोबरच मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत सहा ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) येथे सुरू असलेल्या स्वच्छता कामांची बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. वरळीतील (जी दक्षिण विभाग) नेहरू विज्ञान केंद्र नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाची माहिती आयुक्तांनी घेतली. नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात पाणी साचणाऱ्या ठिकाणांच्या आजूबाजूच्या परिसरातील कचरा तसेच नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

वरळी नाका तसेच संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) परिसरामध्ये सखल ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी मेट्रो तसेच रस्ते विभाग यांच्या समन्वयाने पावसाळी जलवाहिनीला संलग्न असणाऱ्या जोडण्या सुस्थितीत राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दादर धारावी नाला येथेही आयुक्तांनी भेट दिली. या नाल्यात तरंगता कचरा ही मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नालेस्वच्छता करणे अपेक्षित आहे. या भागात काही ठिकाणी भिंत खचली आहे. संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे, असे निर्देशही महापालिका आयुक्त भिडे यांनी दिले.