घनकचरा व्यवस्थापन सर्वाधिक वाईट विभाग

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग अत्यंत वाईट स्थितीत आहे. १३,५०० कचरापेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत प्रस्ताव मंजूर होणार नाही. खरेदी प्रक्रिया जेम पोर्टलद्वारे करण्याची मागणी सदस्यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाने आपली कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे.

shocking standards of municipal solid waste management

महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन हा सर्वाधिक वाईट विभाग आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज असल्याची तीव्र टीका स्थायी समितीतील सदस्यांनी बुधवारी बैठकीत केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून समिती सदस्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर येईपर्यंत हा प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी राखून ठेवण्यात आला.

मुंबई महापालिका १३,५०० कचरापेट्यांची खरेदी करणार आहे. २४० लिटर क्षमतेच्या डब्यांची खरेदी करण्यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कचरापेटीची किंमत २,०३९ रुपये आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. मात्र, महापालिकेतील नेमक्या कोणत्या विभागांना किती कचरापेट्या देणार, ही खरेदी प्रक्रिया जेम पोर्टलद्वारे का करत नाही, सार्वजनिक ठिकाणी किती कचरापेट्या कमी केल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच स्थायी समितीतील सदस्यांनी बैठकीत केली. सविस्तर माहितीच नसल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामावरही प्रश्न उपस्थित झाले.

महापालिकेच्या नेमक्या कोणत्या विभागांना किती कचरापेट्या देणार याची माहितीच प्रस्तावात उपलब्ध नाही. सविस्तर प्रस्ताव आणा त्यानंतरच मंजूर करा आणि या कचरापेट्यांची खरेदी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलद्वारे त्याची खरेदी करण्याची मागणी शिवसेना पक्षाचे अमेय घोले यांनी केली. शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनीही हीच मागणी उचलून धरली. घनकचरा व्यवस्थापन विभागाने मानसिकता बदलण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली. एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी तर, सर्वांत वाईट असा विभाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन असल्याची टीका केली. तर, कचरापेट्या स्वस्त कशा, असा प्रश्न काँग्रेस गटनेते अश्रफ आजमी यांनी उपस्थित केला.