भाजप नेते, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी क्रांती चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
खरगे देशातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर केलेले वक्तव्य हे एका व्यक्तीविरुद्ध नव्हे तर संपूर्ण देशवासीयांच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांना राज्याबाहेर नेऊन बेकायदा अटक केल्याचा आरोप करून या घटनेचाही निषेध करण्यात आला. आंदोलनप्रसंगी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल आमेर, प्रदेश सरचिटणीस अजय डिडोरे, प्रदेश सचिव गुरमितसिंग गिल, शोएब शेख, इरफान पठाण, शहराध्यक्ष सागर नागरे, डॉ. पवन डोंगरे, दीपाली मिसाळ, संदीप रगडे, मुदस्सीर अन्सारी, राज ढेपले, सतीश चाबुकस्वार उपस्थित होते.



