रिडा राज्यातील एव्हरग्लेड्स हा शेकडो एकरांमध्ये पसरलेला दलदलीचा प्रदेश आहे. अमेरिकेतील जैवविविधतेने सर्वांत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परिसंस्थांपैकी एक अशी याची ओळख आहे. गेल्या काही दशकांपासून या प्रदेशात एक गंभीर समस्या पुढे आली आहे. एखादे धरण, महामार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प यामुळे ही समस्या निर्माण झालेली नसली, तरी तिच्या मुळाशी मानवी बेफिकीरीच आहे.
पाळीव म्हणून आणलेला एक परदेशी प्राणी आज स्थानिक जैवविविधतेसाठी संकट ठरला आहे. त्याचा या खंडाशी किंवा इथल्या मातीशी दूरवरचाही संबंध नव्हता. आज त्याने एव्हरग्लेड्स या निसर्गरम्य भूमीवर ताबा मिळवला आहे. त्याचे नाव आहे ‘बर्मीज पायथन’ अर्थात बर्मी अजगर . या प्राण्यामुळेच फ्लोरिडा राज्य सरकारवर अजगर-शिकारीची स्पर्धा, म्हणजेच ‘ फ्लोरिडा पायथन चॅलेंज ’, घेण्याची वेळ आली आहे.बर्मी अजगर हे मूळचे आग्नेय आशियातील. म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, सिंगापूरसह भारतातील ईशान्येकडील काही राज्यांत या अजगरांचा अधिवास आहे. साधारण १९७० आणि १९८० च्या दशकात अमेरिकेत परदेशी प्राण्यांना घरात पाळीव प्राणी, म्हणजेच ‘एक्झॉटिक पेट’, म्हणून ठेवण्याची मोठी लाट आली होती. या काळात लाखो डॉलरचा व्यापार करून वाघांपासून ते लहानशा कोळ्यापर्यंत अनेक प्रकारचे प्राणी विविध देशांतून अमेरिकेत आणण्यात आले. याच काळात बर्मी अजगरही आशियातून अमेरिकेत कायदेशीर आणि बेकायदा मार्गाने आयात केले गेले.
सुरुवातीला काचेच्या पेटीत ठेवताना गोंडस दिसणारे हे अजगर काही वर्षांत १० ते १५ फूट लांब, वजनदार आणि अफाट ताकदीचे झाले. तेव्हा हौशी मालकांची त्यांना सांभाळताना दमछाक होऊ लागली. त्यांना खाऊ घालणे आणि सुरक्षित ठेवणे अशक्य झाल्यावर अनेक बेजबाबदार मालकांनी ते अजगर एव्हरग्लेड्सच्या दलदलीत गुपचूप सोडून दिले.
यात भर पडली ती आणखी एका घटनेने. १९९२ मधील ‘अँड्र्यू’ या अतिशय भीषण चक्रीवादळात मायामी शहराजवळील परदेशी प्राण्यांचे एक पैदास केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. वादळामध्ये केंद्राच्या भिंती कोसळल्या आणि तेथून शेकडो बर्मी अजगर थेट एव्हरग्लेड्सच्या जंगलाच्या दिशेने गेले. त्यानंतर काही वर्षांतच एव्हरग्लेड्सवर या अजगरांनी विळखा घालण्यास सुरुवात केली.
तेथील ऊबदार, दमट हवामान, विस्तीर्ण जलाशय आणि मुख्य म्हणजे त्याची शिकार करू शकेल असा कोणताही नैसर्गिक भक्षक तेथे नव्हता. परिणामी, त्यांची संख्या वेगाने वाढू लागली. खाद्याच्या शोधात त्यांनी स्थानिक वन्यजीवांचा फडशा पाडण्यास सुरुवात केली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे या संस्थेच्या अभ्यासानुसार, या अजगरांमुळे एव्हरग्लेड्समधील ससे, रॅकून, ओपोसम आणि बॉबकॅट या स्थानिक रानमांजरांची संख्या ९० टक्क्यांहून अधिक घटली आहे. अनेक दुर्मीळ पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले हे अजगर गिळंकृत करत आहेत. एवढेच नाही, तर फ्लोरिडाची ओळख असलेल्या महाकाय ‘अ ॅलिगेटर’ या मगरींबरोबरही बर्मी अजगरांच्या जीवघेण्या लढाया होतात.
थोडक्यात, या एका प्राण्याने तेथील स्थानिक निसर्गचक्र उद्ध्वस्त करून टाकले. या समस्येचे गांभीर्य लक्षात आल्याने फ्लोरिडा प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कठोर पावले उचलली. यातूनच ‘फ्लोरिडा पायथन चॅलेंज’ ही स्पर्धा पुढे आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश एव्हरग्लेड्समधील अजगरांची संख्या थेट कमी करणे आणि आक्रमक प्रजातींमुळे निसर्गावर कोसळणाऱ्या आपत्तीबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे.
ही स्पर्धा केवळ व्यावसायिक शिकाऱ्यांपुरती मर्यादित नाही. या स्पर्धेत अमेरिकेसह जगाच्या विविध भागांतून स्पर्धक सहभागी होतात. यामध्ये निसर्गप्रेमी, वैज्ञानिक, लष्करातील माजी सैनिक, साहसी पर्यटक आणि सामान्य नागरिकही असतात. स्पर्धकांना आधी अजगर ओळखण्याचे आणि त्यांना सुरक्षितपण-मानवी जीवाला धोका न पोहोचवता -पकडण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते.
या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी फ्लोरिडा सरकार आणि विविध संस्थांकडून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. सर्वांत जास्त अजगर पकडणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या शिकाऱ्याला १० हजार डॉलरचे मुख्य बक्षीस दिले जाते. दुसऱ्या क्रमांकासाठी २,५०० डॉलर मिळतात, तर सर्वांत लांब किंवा वजनाने मोठा अजगर पकडणाऱ्याला १,५०० डॉलरचे विशेष बक्षीस दिले जाते.
या जुलैमध्ये पार पडलेल्या १० दिवसांच्या मोहिमेत नऊशेपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला. या १० दिवसांत २८० महाकाय अजगर पकडून हटवण्यात यश आले. टॉम राहिल या अनुभवी शिकाऱ्याने ९६ अजगर पकडून मुख्य बक्षीस पटकावले. या स्पर्धेत पकडलेला सर्वांत मोठा अजगर तब्बल १६ फूट ५ इंच लांबीचा होता.
भारतीय इरुलांचे कौशल्य
या स्पर्धेशी भारताची रंजक आठवण जोडलेली आहे. सुरुवातीच्या काळात फ्लोरिडा सरकारला हायटेक कॅमेरे, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही या चपळ आणि लपून राहणाऱ्या अजगरांना शोधणे कठीण जात होते. तेव्हा त्यांनी २०१७ मध्ये भारतातील इरुला या जमातीची मदत घेण्याचे ठरवले.
तमिळनाडूतील या आदिवासी जमातीतील दोन निष्णात सर्पमित्र-मासी सादयन आणि वडीवेल गोपाल-यांना फ्लोरिडा सरकारने विशेष निमंत्रण देऊन अमेरिकेत बोलावले. इरुला जमातीकडे पिढ्यानपिढ्या सापांचा माग काढण्याचे आणि त्यांना हाताने पकडण्याचे पारंपरिक ज्ञान आहे.
या दोन भारतीय सर्पमित्रांनी अमेरिकेच्या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाला पार मागे टाकले. वाळलेल्या पानांची झालेली हालचाल, जमिनीवरील पुसटशा खुणा आणि गंध यांवरून त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत ६८ अवाढव्य अजगर पकडून दिले. त्यात एक १९ फूट लांब मादी अजगर होती.
भारतातील अँटिव्हेनम, म्हणजेच सापाच्या विषावरील लस, निर्मितीतील योगदान आणि हे दुर्मीळ पारंपरिक कौशल्य जागतिक स्तरावर पोहोचवल्याबद्दल भारत सरकारने २०२३ मध्ये मासी सादयन आणि वडीवेल गोपाल यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने भूषवले आहे.
‘फ्लोरिडा पायथन चॅलेंज’ ही केवळ साहसी मोहीम किंवा पैशांसाठी खेळली जाणारी स्पर्धा नाही, तर मानवाने निसर्गात केलेल्या अनधिकृत हस्तक्षेपाची भरपाई करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. अजगर पकडणाऱ्याला मोबदला मिळतो; पण निसर्गाने मोजलेली किंमत त्याहून कितीतरी मोठी आहे.
एका परदेशी प्राण्याला त्याच्या मूळ अधिवासातून उचलून दुसऱ्या पर्यावरणात सोडल्यास संपूर्ण निसर्गचक्र कसे कोसळू शकते, याचे हे एक जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. आज एव्हरग्लेड्सच्या दलदलीत रात्रीच्या अंधारात टॉर्च घेऊन फिरणारे शिकारी केवळ अजगर शोधत नाहीत, तर ते निसर्गाचे बिघडलेले संतुलन पूर्ववत करण्याची धडपड करत आहेत.