Chief Minister Reviews Medical Facilities Focus On Advanced Treatment
वैद्यकीय सुविधांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
महाराष्ट्र टाइम्स•
मेडिकलनंतर मुख्यमंत्र्यांनी मेयो रुग्णालयाला भेट दिली. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी नव्याने उभारण्यात येत असलेल्या मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक आणि शस्त्रक्रियागृहांची पाहणी केली. कामांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत रुग्णांच्या सोयीसाठी सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पाहणी केली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत त्यांनी कामांना गती देण्याचे निर्देश दिले.मेडिकलमध्ये मुख्यमंत्र्यांनी एनआयसीयू आणि पीआयसीयू विभागाची पाहणी केली. पीआयसीयूमधील अत्याधुनिक व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले. शस्त्रक्रियागृह आणि सर्जिकल आयसीयूची पाहणी करून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रुग्णालयातील सुरू प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आमदार मोहन मते आणि रितेश गावंडे उपस्थित होते.
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील सर्पदंशग्रस्त बालिकेची वॉर्डात जाऊन भेट घेतली. तिच्या प्रकृतीची चौकशी करून आईला धीर दिला. बालिकेवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.