Ensure Prompt And Effective Utilization Of Central Funds
‘केंद्रीय निधीचा पूर्ण विनियोग व्हावा’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘राज्यात केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. या निधीच्या परिपूर्ण विनियोगास प्राधान्य देत यावर्षी विनियोगाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक राहील याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी’, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित केंद्रीय योजनांच्या निधीच्या उपलब्धतेसह त्याच्या विनियोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ‘महाराष्ट्राकडे राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने विभागांनी नियोजन करावे. केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करत विकासकामांना अधिक गती देता येईल. पुढील वर्षी सुमारे १६ ते १७ हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, त्यातील मोठा हिस्सा भांडवली खर्चाचा आहे. त्यामुळे हा केंद्रीय निधी खर्च करण्यास विभागप्रमुखांनी प्राधान्य द्यावे. विहित मुदतीत योजनांच्या व्यापक अमंलबजावणीसाठी हा निधी विनियोगात आणल्या जाईल यासाठी विभागांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी’, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.