विश्वासार्ह पायाभरणीसाठी...

Contributed byमहादेव पंडित|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विश्वासार्ह पायाभरणीसाठी...
ज्यांतील महानगरांत खोल तळघरे, उंच इमारती आणि गुंतागुंतीच्या पाया प्रणालींचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना जिओटेक्निकल अभियांत्रिकीचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. मात्र, या क्षेत्रातील परवानाधारक सल्लागारांना अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.

वाढती लोकसंख्या, रोजगाराच्या संधी आणि वेगवान शहरीकरणामुळे कमी उंचीच्या इमारतींच्या जागी बहुमजली व गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. अशा इमारतींची सुरक्षितता त्यांच्या पायावर अवलंबून असते. पाया हा कोणत्याही इमारतीचा सर्वांत महत्त्वाचा संरचनात्मक घटक आहे. प्रत्येक संरचनेलाही पाया असतो. संपूर्ण इमारतीची स्थिरता, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य पायाच्या गुणवत्तेवर ठरते.
शहरांत मातीची रचना अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. उदा. मुंबईत काही भाग भरणीच्या आणि दलदलीच्या जमिनीवर आहेत, तर काही ठिकाणी मुरमाड किंवा खडकाळ जमीन आढळते. अनेक भागांत जमिनीखालील पाण्याची पातळीही अधिक आहे. मुंबईला सुमारे १५० किलोमीटरचा समुद्रकिनारा असल्याने किनारपट्टीलगतच्या भागात मातीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पासाठी नियमांनुसार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पाया आराखडा तयार करणे अत्यावश्यक ठरते.

बांधकामांमध्ये आयसोलेटेड फूटिंग, कम्बाइंड फूटिंग, राफ्ट फाउंडेशन, वेल फाउंडेशन आणि पाइल फाउंडेशन अशा विविध पाया प्रणाली वापरल्या जातात. खोल तळघरांसाठी शोअर पाइल, टच पाइल आणि अँकर प्रणालींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या सर्व प्रणालींची रचना संबंधित भूगर्भीय परिस्थिती, माती परीक्षण अहवाल आणि अभियांत्रिकी मानकांच्या आधारे होणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक मोठ्या प्रकल्पासाठी सविस्तर माती परीक्षण अहवाल आणि अनुभवी, परवानाधारक जिओटेक्निकल सल्लागाराची नियुक्ती बंधनकारक केली पाहिजे.

सध्या अनेक प्रकल्पांमध्ये जिओटेक्निकल सल्लागार वास्तुविशारद किंवा संरचना सल्लागारांच्या अधीनस्थ सल्लागार म्हणून काम करतात. परिणामी, पाया आराखडा आणि खोल पायाखुदाईसारख्या महत्त्वाच्या कामांत त्यांची स्वतंत्र भूमिका स्पष्ट होत नाही. प्रत्यक्षात इमारतीची सुरक्षितता पायावर अवलंबून असल्याने जिओटेक्निकल सल्लागाराला स्वतंत्र, अधिकृत आणि उत्तरदायी व्यावसायिक म्हणून मान्यता देणे गरजेचे आहे.

पार्किंगची वाढती गरज लक्षात घेता शहरांत खोल तळघरे आणि गुंतागुंतीच्या पाया प्रणाली असलेल्या उंच इमारती मोठ्या प्रमाणावर उभारल्या जात आहेत. अशा प्रकल्पांमध्ये पाया आराखड्यातील किंवा बांधकामातील किरकोळ त्रुटीही मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. जुलै २०२६ मध्ये मुसळधार पावसामुळे भांडुप पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील एशियन पेंट्ससमोरील तळघराच्या बांधकामासाठी उभारलेली पायलिंग सपोर्ट प्रणाली कोसळली. तसेच १३ मे २०२४ रोजी घाटकोपर येथे प्रचंड होर्डिंग कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनांनी माती परीक्षण, पाया आराखडा, खोल पायाखुदाईतील देखरेख आणि पाया स्थिरता प्रमाणपत्र यांचे महत्त्व अधोरेखित केले.

बांधकामाचा पाया हा संपूर्ण प्रकल्पातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मातीची सुरक्षित वहनक्षमता निश्चित करणे, योग्य पाया प्रणाली निवडणे आणि बांधकामादरम्यान तिची तपासणी करणे आवश्यक असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नियमावलीत माती परीक्षणापासून पाया पूर्ण होईपर्यंत परवानाधारक जिओटेक्निकल सल्लागार किंवा ‘जिओटेक्निकल इंजिनीअर ऑन रेकॉर्ड” (GEoR) नियुक्त करणे बंधनकारक नाही.

वास्तुविशारद इमारतीच्या नियोजनाचा तज्ज्ञ असतो. स्ट्रक्चरल इंजिनीअर अधिसंरचनेचा तज्ज्ञ असतो, तर जिओटेक्निकल अभियंता अधोसंरचनेचा तज्ज्ञ असतो. इमारतीची सुरक्षितता या सर्वांच्या समन्वित कार्यावर अवलंबून असते. वास्तुविशारद आणि परवानाधारक संरचना सल्लागारांच्या प्रमाणपत्रांना जसे कायदेशीर महत्त्व आहे, तसेच पाया आराखडा आणि अंमलबजावणीसाठी जिओटेक्निकल सल्लागाराचे प्रमाणपत्रही अनिवार्य असावे.

या अभावामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. काही पाया आराखडे अपुऱ्या किंवा अप्रमाणित माती परीक्षण अहवालांवर आधारित असतात. काही इमारतींमध्ये पाया वेगवेगळ्या प्रमाणात खचणे, तडे जाणे किंवा संपूर्ण रचना असुरक्षित होण्याच्या घटना घडतात. मान्सूनमध्ये तळघरासाठी खोल पायाखुदाई करताना माती किंवा शोरिंग प्रणाली कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे शेजारच्या इमारतींना धोका निर्माण होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाया आराखडा आणि अंमलबजावणीसाठी कोणताही अधिकृत जिओटेक्निकल व्यावसायिक जबाबदार नसल्याने उत्तरदायित्वाचा अभाव राहतो.

IS 19235:2025 – Geotechnical Engineering Services या भारतीय मानकात जिओटेक्निकल अभियांत्रिकी सेवांसाठी पात्रता, व्यावसायिक जबाबदाऱ्या, नैतिक आचारसंहिता आणि गुणवत्ता नियंत्रणाची रूपरेषा दिली आहे. या मानकाच्या आधारे महानगरपालिकांनी विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करणे आवश्यक आहे.

विद्यमान परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनीअर प्रणालीच्या धर्तीवर जिओटेक्निकल सल्लागारांची नोंदणी आणि परवाना प्रणाली सुरू करावी. प्रत्येक इमारत प्रस्तावासाठी ‘जिओटेक्निकल इंजिनीअर ऑन रेकॉर्ड” नियुक्त करणे बंधनकारक करावे. तळघर, पाइल फाउंडेशन, ओपन फाउंडेशन किंवा खोल पाया असलेल्या प्रकल्पांसाठी परवानाधारक जिओटेक्निकल सल्लागाराने स्वाक्षरी केलेला भू-तांत्रिक अन्वेषण अहवाल इमारत मंजुरीसाठी अनिवार्य दस्तऐवज करावा. पाया परीक्षण आणि पाया स्थिरता प्रमाणपत्राची अट DCPR तसेच Auto-DCR प्रणालीमध्ये समाविष्ट करावी.

खोल पायाखुदाई आणि शोरिंग प्रणाली असलेल्या प्रकल्पांत GEoR कडून टप्प्याटप्प्याने स्थळ पाहणी, तपासणी आणि प्रमाणन बंधनकारक असावे. तसेच Inclinometer, Settlement Markers, Piezometers, Tilt Meters यांसारख्या उपकरणांच्या साहाय्याने जमिनीची, शोरिंग प्रणालीची आणि लगतच्या इमारतींची हालचाल नियमित नोंदवणे आवश्यक आहे. या निरीक्षणांचे विश्लेषण करून तातडीच्या सुधारात्मक उपाययोजना राबविण्याची जबाबदारी GEoR वर निश्चित करावी.

जगातील अनेक प्रगत देशांमध्ये जिओटेक्निकल अभियांत्रिकीसाठी स्वतंत्र परवानाधारक आणि उत्तरदायी व्यावसायिक प्रणाली अस्तित्वात आहे. राज्यांतील वेगाने विकसित होणाऱ्या महानगरात अशी व्यवस्था निर्माण करणे ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून सार्वजनिक सुरक्षिततेतील दीर्घकालीन गुंतवणूक आहे.

भविष्यातील सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत मुंबई घडविण्यासाठी ‘जिओटेक्निकल इंजिनीअर ऑन रेकॉर्ड’ ही संकल्पना नियमावलीत समाविष्ट करणे आता अपरिहार्य आहे. हा निर्णय जितका लवकर होईल, तितकी बांधकामे अधिक सुरक्षित, उत्तरदायी आणि दीर्घायुषी ठरतील.

(लेखक इमारत संरचना सल्लागार आहेत.)