आजी-आजोबांचा रॅम्पवॉक, फॅशन शोही

महाराष्ट्र टाइम्स
आजी-आजोबांचा रॅम्पवॉक, फॅशन शोही
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘वय ही केवळ एक संख्या आहे’, हे सिद्ध करत नागपूरच्या ज्येष्ठ नागरिक ांनी रॅम्पवर उतरून आपल्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनानिमित्त ओसरी प्रॉडक्शन्सतर्फे ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक फॅशन शो : सेकंड इनिंग’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून सभागृह टाळ्या व शिट्ट्यांनी दणाणून गेले.

या फॅशन शोमागील संकल्पना सांगताना सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर म्हणाले, ‘सुमारे चौदा वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांचा फॅशन शो आयोजित केला होता. घरी सुनांना मेहंदी आणि मेकअप करताना पाहून एकदा आईने ‘मी पण करून पाहू का? मलाही रॅम्पवॉक करायचा आहे’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा लक्षात आले की, वयाच्या या टप्प्यावरही ज्येष्ठांना छान कपडे घालून रॅम्पवॉक करण्याची इच्छा असते. आईच्या याच इच्छेतून या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आज आपण यशस्वीपणे तिसऱ्या सीझनपर्यंत पोहोचलो आहोत.’
या फॅशन शोमध्ये ६५ ते ८५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात तीन फेऱ्या घेण्यात आल्या. रेट्रो फेरीत स्पर्धकांनी नव्वदीच्या दशकातील वेशभूषा साकारून जुन्या आठवणींना उजळा दिला. फंकी फेरीत ज्येष्ठांनी मनमोकळ्या अंदाजात सादरीकरण केले. पारंपरिक फेरीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध वेशभूषांनी रंगत आणली. फॅशन शोसोबतच ज्येष्ठांनी नृत्य, अभिनय आणि स्टँडअप कॉमेडीचेही सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात गौरी जथे हिच्या नृत्याने झाली. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग यांच्या स्टँडअप कॉमेडीने उपस्थितांना खळखळून हसविले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश गुप्ता, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, स्मिता हॉलिडेजचे जयंत गोरे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्वप्ना नायर, कारागृह अधीक्षक वैभव आगे व दीपा आगे, महाचायचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुळकर्णी आणि पिंकू जोसेफ उपस्थित होते. शोचे कोरिओग्राफर म्हणून मनीषा बावनकर, प्रांजली शेवाळे आणि विजय जथे यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन विजय जथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विष्णूजी की रसोई, रोटरी एलिट, स्मिता हॉलिडेज, गिफ्ट फॅक्टरी, देशकर होमिओ क्लिनिक, एम.डी. ट्रॅव्हल, सीएसी ऑलराउंडर, राधेश्याम झनकलाल, सयाजी हॉटेल आणि महाचाय यांचे सहकार्य लाभले.