मुंबईच्या देव रुपारेलिया याने रविवारी सुशांत चिपलकट्टीच्या स्मृती महापौर चषक आंतरराष्ट्रीय ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये दिल्लीच्या ईशिता नेगीने बाजी मारली.
शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही १९ वर्षांखालील गटाची स्पर्धा झाली. मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित देवने सोळाव्या मानांकित उत्तराखंडच्या निश्चल चंदचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. ही लढत ४६ मिनिटे चालला. देव मुंबईच्या नितीश बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक नितीशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. देवने सुरुवातीपासूनच लढतीवर वर्चस्व राखले. त्याने अखेरपर्यंत संयम गमावला नाही. त्याने नेटजवळ सुरेख खेळ करताना परतीच्या फटक्यांनीही निश्चलवर वर्चस्व राखले. त्याने क्रॉस कोर्टच्या फटक्यांचाही सुरेख वापर केला. मुलींच्या गटात अंतिम सामन्यात १७ वर्षीय दुसऱ्या मानांकित ईशिताने महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीचा २१-१९, २१-१८ असा पराभव केला आणि विजेतेपदाचा मान पटकावला. ही लढत ३६ मिनिटे चालली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पुणे महापौर करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुंदर शेट्टी, गिरीश नातू, मंजूषा सहस्रबुद्धे, बालकिशन चौधरी, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, शशांक हळबे, रणजित नातू आदी उपस्थित होते.
पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत पवन सुरेश आणि पुनीत सुरेश यांनी बाजी मारली. या जोडीने इंडोनेशियाच्या आर्यबका ओक्टा डिसाबियन- महंमद जिलाझिक अर्तांडो झकारिया या जोडीचा २५-२३, २१-१९ अशी मात केली. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या महंमद जिलाझिक अर्तांडो झकारिया आणि अफिजाह रहमाधानी यांनी बाजी मारली. या जोडीने भारताच्या पुनीत सुरेश- दीपक राज अदिती या जोडीचा २४-२६, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. मुलींच्या दुहेरीत थायलंडच्या छंतारत मार्नडकुल-पीअरप्लॉय सुत्तीवारयनॉन जोडीने जेतेपद मिळवले.