इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. चर्चेदरम्यान नेतान्याहू यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारंपरिक मशाल (टॉर्च) प्रज्वलित करण्याचे निमंत्रण दिले आहे.
नेतान्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याविषयी माहिती देताना सांगितले, ‘मी माझे मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी एका शूर भारतीय वैमानिकासोबत मशाल प्रज्वलित करण्याचे निमंत्रण त्यांना दिले.’ नेतान्याहू यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी या निमंत्रणाबद्दल आभार मानले आणि जमीन असो वा आकाश, दोन्ही देश एकत्रितपणे दहशतवादाविरुद्ध लढा देत असल्याचे स्पष्ट केले.३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीव येथे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात सहवैमानिकाने कॉकपिटमध्येच मुख्य वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. विमानात २७ बालकांसह १७४ प्रवासी होते. गंभीर जखमी अवस्थेतही मच्छार यांनी प्रसंगावधान राखून कॉकपिटचा दरवाजा उघडला. परिणामी, इतर कर्मचारी आणि प्रवाशांनी हल्लेखोराला रोखले. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियात सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सध्या त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीत उपचार सुरू आहेत.