सुरगाणा : महाराष्ट्रातील पहिले ‘डार्क स्काय’ गाव म्हणून निवड झालेल्या सुरगाणा तालुक्यातील उदमाळचे ग्रामस्थ पर्यटकांच्या स्वागतासाठी आतुरले आहेत. गावात येणाऱ्या पर्यटकांसह खगोलप्रेमींसाठी ‘ उदमाळ थाळी ’ विशेष आकर्षण ठरणार आहे. पंजाबी, गुजराती, राजस्थानी किंवा महाराष्ट्रीय थाळीची चव चाखणाऱ्या पर्यटकांना आमची पारंपरिक, पौष्टिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची थाळी खवय्येगिरीचा तेवढाच आनंद देईल, असा विश्वास ग्रामस्थांनी ‘मटा’कडे व्यक्त केला.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील डोंगरमाथ्यावर उदमाळ गाव वसले आहे. ‘डार्क स्काय इंटरनॅशनल’ या संस्थेकडून प्रमाणित होणारे हे महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय ‘ डार्क स्काय समुदाय ’ गाव म्हणून निवडले गेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.गावात येणाऱ्या पर्यटकांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था निवडक ग्रामस्थांच्या घरांत केली जाणार आहे. त्यांच्या पाहुणचारात कसूर राहणार नाही, याची खबरदारी ग्रामस्थ घेत आहेत. पर्यटकांना येथे ‘उदमाळ थाळी’ची मेजवानी मिळणार आहे. या शाकाहारी थाळीत नागलीची भाकरी, उडदाच्या डाळीची आमटी, वरण, भात, उडदाची तेलविरहित भजी आणि ठेचा प्राधान्याने असेल. याशिवाय नागलीचा शिरा तोंड गोड करणार आहे. त्या-त्या हंगामातील रानभाजीचाही थाळीत समावेश असेल.
तेरा ही अळूसारखीच; पण मोठ्या आकाराची पाने, बांबूशूट्स अर्थात वास्ती, मोठ्या आकाराची कर्टुले, माठाची भाजी, अंबाडी, शेवगा अशा स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थांचा उपलब्धतेनुसार थाळीत समावेश असणार आहे. पर्यटकांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी गावातील बचतगटांवर सोपवली जाणार आहे. पर्यटकांना निवडक मांसाहारी पदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील.
आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा अर्ध्या तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामस्थ सादर करणार असून, यातून पर्यटकांचे रंजन होणार आहे. यामध्ये तारपा, पावरी, तूर, मादळ, कहाळी या पारंपरिक वाद्यांवर आदिवासी बांधव नृत्य सादर करणार आहेत.
नाशिक ते उदमाळ अंतर साधारणतः १३० ते १४० किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना स्टारगेझिंग अर्थात खगोलदर्शनाचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर येथील जंगलभागातील औषधी व आयुर्वेदिक वनस्पतींची ओळखही करून घेता येईल. गावातील धुकट्या डोंगरावर ट्रेकचा आनंद पर्यटक घेऊ शकतील. डोंगरावरून सापुताऱ्यासह साल्हेर, मुल्हेर, हातगड आणि मांगी-तुंगी या किल्ल्यांचे दर्शन पर्यटकांना घडणार आहे.