शहरात दोन दिवस नळ कोरडे

Contributed by: नाशिक,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शहरात दोन दिवस नळ कोरडे
शहरातील प्रमुख पाइपलाइनची गळती दुरुस्ती आणि अत्यावश्यक कामांसाठी महापालिकेने शनिवारी (२४ ऑक्टोबर) संपूर्ण दिवसाचा शटडाउन जाहीर केला आहे. या कामांसाठी साधारणत: १२ ते १८ तासांचा कालवाधी लागणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळचा पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.

नाशिक पूर्व विभागात लेखानगर येथील ३०० मिमी व्यासाच्या मुख्य पाइपलाइनवरील गळती बंद करणे; तसेच कलानगर येथील जलकुंभाची वितरण वाहिनी अस्तित्वातील वितरण वाहिनीला जोडण्याचे काम केले जाणार आहे. नाशिक पश्चिम विभागात रामराज्य जलकुंभ, त्र्यंबक रस्ता, जीपीओ जलकुंभ आणि बी. डी. भालेकर मैदान परिसरातील पाइपलाइन व व्हॉल्व्हची कामे करण्यात येणार आहेत.
नाशिक रोड विभागात पाटील गॅरेज, महेशनगर, वडनेर रस्ता, रेजिमेंटल प्लाझा, देवळाली गाव, मुक्तिधाम टाकी, विहित गाव आणि जय भवानी टाकी परिसरातील गळती दुरुस्ती; तसेच व्हॉल्व्ह ग्रीसिंगची कामे केली जाणार आहेत. पंचवटी विभागात म्हसरूळ-बोरगड उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, अमृतधाम चौफुलीवरील मुख्य वितरण वाहिनीचे क्रॉस कनेक्शन आणि शक्तीनगर येथील नवीन उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्यात येईल. सातपूर विभागात संत कबीरनगर, आनंदी आंगण जॉगिंग ट्रॅक आणि सिरीन मिडोज परिसरातील ५०० मिमी व १२०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनवरील गळती बंद केली जाणार आहे.

नवीन नाशिक विभागात पाथर्डी फाटा, अंबड गाव स्मशानभूमी, डीजीपीनगर आणि विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील पाइपलाइन व व्हॉल्व्हची कामे नियोजित आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे १२ ते १८ तास लागणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.